शिरोळमधील पाणी योजनांची कामे सुरू होणार, ‘जलजीवन मिशन योजने’त समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये बऱयाच वर्षांपासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजना, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन अनेक वर्षे अपूर्ण अवस्थेत राहिलेल्या पाणीपुरवठा योजना, तर काही गावांमध्ये नव्याने मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व योजनांचा ‘जलजीवन मिशन योजने’अंतर्गत (जे. जे. एम.) समावेश झाल्याने योजनांची रखडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत.

शिरोळ तालुक्यातील सध्या 24 गावांमध्ये जवळपास 48 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा या पाणी योजना आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱयांना पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाणीपुरवठा योजनांच्या कामांची निविदा प्रक्रिया आता सुरू झाली आहे. प्रत्यक्ष कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन सचिव संजीव जयस्वाल, जीवन प्राधिकरणचे अभिषेक कृष्णा, कोल्हापूर जिल्हा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक ढोंगे व या विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी यांनी संबंधित कामासाठी वेळोवेळी बैठकी घेतल्या होत्या. सध्या लाटवाडी गावासाठी 91 लाख 67 हजार इतक्या खर्चाच्या योजनेची वर्क ऑर्डर निघाली असून, तेथील कामाला लवकरच सुरुवात होत आहे. घालवाड 1 कोटी 67 लाख, राजापूर 1 कोटी 2 लाख 65 हजार या गावांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.

उर्वरित मजरेवाडी 1 कोटी 47 लाख 71 हजार, खिद्रापूर 1 कोटी 79 लाख 32 हजार, चिंचवाड 1 कोटी 41 लाख 80 हजार, टाकवडे 1 कोटी 07 लाख 46 हजार, शेडशाळ 58 लाख 37 हजार, आलास 1 कोटी 74 लाख 12 हजार, गणेशवाडी 1 कोटी 46 लाख 82 हजार, टाकळीवाडी 1 कोटी 87 लाख 30 हजार, शिरदवाड 4 कोटी 25 लाख, शिवनाकवाडी 3 कोटी, कोंडीग्रे 2 कोटी 45 लाख 94 हजार, दानोळी 4 कोटी 62 लाख 48 हजार, कवठेसार 1 कोटी 12 लाख 09 हजार, अब्दुललाट 1 कोटी 97 लाख, कनवाड 61 लाख 11 हजार, जैनापुर 2 कोटी 32 लाख 01 हजार, चिपरी 4 कोटी 61 लाख 12 हजार, तमदलगे 2 कोटी 19 लाख 35 हजार, गौरवाड 96 लाख 18 हजार घोसरवाड 1 कोटी 28 लाख 70 हजार व सैनिक टाकळी 3 कोटी 22 लाख या गावांमधील पाणीपुरवठा योजनांच्या कामांच्या निविदा लवकरच प्रसिद्ध होतील.

निमशिरगाव, तेरवाड, यड्राव व नांदणी या गावांतील पाणीपुरवठा कामासंदर्भात तयार केलेली अंदाजपत्रके तांत्रिक दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा विभागाच्या सांगली व पुणे विभागाकडे पाठविण्यात आली आहेत. लवकरच या गावांच्या योजनांना प्रशासकीय मान्यता मिळेल आणि या चारही गावांतील पाणीपुरवठा योजना सुरू होण्याची शक्यता आहे.