भाजपला धक्का, आणखी एका मित्रपक्षाची स्वबळावर लढण्याची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-shah-tense

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

2019 च्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच सत्ताधारी भाजपचा पाय आणखी खोलात अडकत चालल्याचे दिसत आहे. शिवसेना, तेलगू देशम पार्टीनंतर आता एनडीएच्या आणखी एका मित्रपक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिरोमणि अकाली दल (एसएडी)चे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी ही घोषणा केली आहे. हरयाणामध्ये होणाऱ्या येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा सुखबीर सिंह बादल यांनी रविवारी केली.

sukhbir-singh-badal पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पिपली नगरमधील अनाज बाजार येथे शिरोमणि अकाली दलाकडून (एसएडी) एका रॅलीच्या आयोजनक करण्यात आले होते. या रॅलीमध्ये बोलताना सुखबीर सिंह बादल म्हणाले की, ‘आम्ही पंजाबमध्ये दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. आता हरयाणाच्या नागरिकांच्या कल्याणाची जबाबदारी घेण्यासाठी आम्ही तयार आहोत.’ हरयाणामध्ये इतिहास निर्माण घडवण्यासाठी अकाली दलाच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र व्हावे असेही आवाहन बादल यांनी केले. ‘एकदा तुम्ही सर्व अकाली दलाच्या झेंड्याखाली एकत्र याल तेव्हा सत्ताप्राप्तीपासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही’, असेही ते म्हणाले.

‘आम्ही सत्तेत आलो तर कृषि क्षेत्रासाठी विनामुल्य वीज देऊ’, असे आश्वासनही बादल यांनी हरयाणावासियांना दिले. शेतीसाठी विनामुल्य सिंचन योजना, दलितांसाठी 400 युनिट वीज विनामुल्य देण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी दिले. तसेच समाजातील सर्व घटकांसाठी आम्ही नवीन योजना आणू असेही ते म्हणाले.

भाजपला धक्का
शिरोमणि अकाली दलाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला धक्का बसला आहे. यापूर्वी दोन्ही पक्ष प्रत्येक निवडणूक एकत्र लढले आहेत. पंजाबमध्ये गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुका देखील एसएडी आणि भाजपने एकत्र लढल्या परंतु त्यांना दारूण पराभव झाला आणि काँग्रेसने सत्ता स्थापन केली.