
शिरूर शहरातील सरदार पेठ आणि हलवाई चौक यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या अमोल ज्वेलर्स या सोन्याच्या पिढीवर बुधवारी पहाटे चार ते साडेचारदरम्यान चार ते पाचजणांच्या टोळीने दरोडा टाकून १ कोटी ३८ लाख रुपयांचा सोने-चांदीचा ऐवज लंपास केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून, भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ज्वेलर्सचे मालक वैभव पुरुषोत्तम जोशी (वय ४५, रा. सरदार पेठ, मोतीभवन शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चार अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहाटे चार ते साडेचारदरम्यान चारचाकीमधून आलेल्या चार ते पाचजणांनी दुकानाचे शटर अत्याधुनिक कटरने तोडून दुकानाचे आतील सुरक्षा ग्रील आणि काऊंटरची काच फोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील चांदीचे पैंजण, तोडे, वाळे, चैन, हत्ती मोरा असा ७० किलो चांदीचा अंदाजे ६ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज, चांदीचे जोडवे वजन ७ किलो सात लाख रुपये, सोन्याची कर्णफुले, वाट्या, मनी, चैन तसेच अंगठी ४६ ग्रॅम वजन अंदाजे चार लाख चौदा हजार रुपये, सोन्याचे गंठण, चैन, राणीहार, टेंपलहार, टेंपल गंठण, शॉर्टर गंठण, लेडीज अंगठी, बचकन अंगठी ७१४ ग्रॅ म वजनाची किंमत ६४ लाख २६ हजार रुपये, असा एकूण १ कोटी ३८ लाख ४० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
दरम्यान, स्थानिकांना चोरीची चाहूल लागल्यावर आरडाओरडा केला. दुकानदार वैभव जोशी यांना फोन करून सांगितले. दरम्यान, आरडाओरडा झाल्याने दरोडेखोर पळून गेले. दरोडा टाकण्याआधी चोरट्यांनी या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. तसेच सायरनच्या केबल तोडल्या. रस्त्यापलीकडील इमारतीवरील दुकानाचा सीसीटीव्ही कॅमेरा उलट्या दिशेला फिरवला. त्याच्या केबल तोडल्या.
घटनेची माहिती मिळताच, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. पुणे ग्रामीण गुन्हे शाखा, शिरूर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.
पुणे विभाग अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी घटनास्थळी भेट दिली, तर पुणे डॉग स्कॉडच्या साह्याने आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुणे येथील ठसे तसेच फॉरेन्सिक लॅबचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिर्के यांनी भेट दिली.