परभणी जिल्हाभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८९ वी जयंती शहरासह जिल्हाभरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ढोल-ताशांच्या निनांदामध्ये आणि ‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात परिसर दुमदुमला होता. शिवाजी महाराज पुतळा परिसरात लक्षवेधी आकर्षक सजावट करण्यात आली होती. शिवभक्तांनी सकाळी ८ वाजेपासूनच अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती.

शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्यास शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, तालुकाप्रमुख नंदू पाटील, गितेश देशमुख आदींसह शिवप्रेमींनी अभिवादन केले. शहरातील जिंतूर रोड येथील शिवप्रेमींनी दुचाकी वाहनांवरुन भव्य रॅली काढली होती. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. शहरातील रस्ते भगव्या झेंड्यांनी व्यापून गेले होते. चौका-चौकामध्ये भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. शिवाजी महाराजांचे फोटो, मूर्ती, झेंडे, पताका आदींची दुकाने थाटली होती. युवकांनी सुट, पायजमा आणि भगवा फेटे तर महिलांनी भगव्या साड्या परिधान करुन शहरातून दुचाकी रॅली काढली. खानापूर फाटा ते शिवाजी महाराज पुतळापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महापौर मीनाताई वरपुडकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, मनपा सभापती सुनील देशमुख यांच्यासह मनपातील अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरात विशेष पथसंचालन करुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. ठिक-ठिकाणी शिवजन्मोत्सवाचे कार्यक्रम घेण्यात आले. स्वयंसेवकांनी शहरातील शिवाजी चौक, गांधी पार्क, स्टेशन रोड, वसमत रोड या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पथसंचालनाचा समारोप करण्यात आला. पुतळा परिसरामध्ये अनेक भजनी मंडळ सहभागी झाले होते. सायंकाळी सायंकाळी शनिवार बाजार ते शिवाजी महाराज पुतळापर्यंत मिरवणुक काढण्यात येणार असून ही मिरवणुक शहरातील शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्वâ, स्टेशन रोड मार्गे निघणार आहे. या मार्गावर भव्य रांगोळ्या काढून मिरवणुकीचे स्वागत करण्यात येत आहे. या मिरवणुकीमध्ये घोडेस्वार मावळे सहभागी होणार असून बाहेरील जिल्ह्यातील ढोल-ताशांचे पथक आणण्यात आले असून भाला, तलवारबाजीसह अनेक साहसी खेळांचे प्रात्यक्षिक नागरिकांना दाखविले जात आहेत. शिवाजी पुतळा परिसरामध्ये नागरिकांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती. पुतळा परिसराची आकर्षक सजावट मनपाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच अभिवादनासाठी सीडी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अनेक शिवभक्त पुतळा परिसरात ठाण मांडून आहेत. मिरवणुक सुव्यवस्थित व्हावे, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये शिवजयंती निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आले आहेत.