शिवसेनाप्रमुखांवरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांना भिडलेल्या कट्टर शिवसैनिकाचे निधन

23308

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी आणि कट्टर शिवसैनिक भालचंद्र ठाकूर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवसेनेच्या स्थापनेपासून एकनिष्ठ असलेले भालचंद्र ठाकूर हे भालूदादा म्हणून परिचित होते. पश्चिम रेल्वेमध्ये कर्मचारी असलेल्या भालचंद्र ठाकूर यांनी शिवसेनेच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले होते. शिवसेनेच्या स्थापनेच्या काळात ते खजिनदारही होते. शिवसेनाप्रमुखांच्या प्रत्येक दौऱ्यात ते त्यांच्या कायम सोबत राहिले. प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर असत. दादरच्या वीर सावरकर मार्ग येथील माईकृपा सागर इमारतीत ते राहत होते. भालचंद्र ठाकूर यांना वार्धक्यामुळे किडनी तसेच फुप्फुसांचा विकार जडला होता. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर महिनाभर उपचार सुरू होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र भालचंद्र ठाकूर यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नाही. त्यांच्या पश्चात पत्नी वंदना, मुले नीलेश व अभय, मुलगी अर्चना, सुना व नातवंडे असा परिवार आहे. शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, माजी महापौर महादेव देवळे यांनी भालचंद्र ठाकूर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. भालचंद्र ठाकूर यांच्यावर सोमवारी दादर येथील हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी 10.30 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

शिवसेनाप्रमुखांवरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांना भिडले

सत्तरच्या दशकात शिवसेनाप्रमुख नागपूर दौऱ्यावर असताना नागपूर विमानतळावरच त्यांच्यावर समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्यावेळी शिवसेनाप्रमुखांना वाचविण्यासाठी भालचंद्र ठाकूर हे स्वतः हल्लेखोरांना भिडले. यावेळी हल्लेखोरांना चोप देऊन हा हल्ला त्यांनी परतवून लावला.

आपली प्रतिक्रिया द्या