
सामना ऑनलाईन, मुंबई
गिरगावात गणेशोत्सवासाठी उभारलेले मंडप कोणतीही पूर्वसूचना न देता तोडणाऱया महानगरपालिकेच्या अधिकाऱयांनाच आज शिवसैनिकांनी उखडून टाकले. संतप्त शिवसैनिकांनी ‘डी’ वॉर्डावर धडक देऊन अधिकाऱयांना धारेवर धरले. वॉर्ड अधिकाऱयाने शिवसैनिकांना भेटण्यास टाळाटाळ केल्याने शिवसैनिकांनी ‘शिवसेना स्टाईल’ने त्याची मुजोरी उतरवली. यापुढे गणपती मंडळांना विनाकारण हात लावाल तर जे घडेल त्याला सर्वस्वी वॉर्ड अधिकारी जबाबदार असतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. ‘गिरगावचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा निकतवरी लेनच्या गणेशोत्सव मंडळाचा मंडप गेल्या गुरुवारी पालिका अधिकाऱयांनी तोडला. आजही पालिका अधिकारी गिरगावातील खत्तरगल्ली गणेशोत्सव मंडळाचा मंडप पाडायला गेले होते. शेख नावाच्या अधिकाऱयाने ‘मंडप काढा नाहीतर तोडून टाकू’ असा दम दिला. त्यामुळे गिरगावकरांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
याप्रकरणी वॉर्ड अधिकारी विश्वास मोते यांनी गणेशोत्सव मंडळांना पालिकेच्या ‘डी’ वॉर्डात आज सकाळी १० वाजता भेटीसाठी बोलवले होते. शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ हे शिवसैनिक आणि गणेशभक्तांसह वेळेवर तिथे पोहचले होते, परंतु मुजोर मोते हे बैठकीच्या बहाण्याने तिथून निघून गेले. त्यानंतर ते ११ वाजता पुन्हा कार्यालयात आले आणि ‘संध्याकाळी ४ वाजता या, आता वेळ नाही’ असे त्यांनी शिवसैनिकांना सांगितले. त्यामुळे शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत वॉर्ड कार्यालय दणाणून सोडले आणि मोते यांच्या कार्यालयात प्रवेश केला.
मंडपांसाठी परवानगी मागूनही पालिका देत नाही मग मंडप उभारायचे कुठे असा सवाल सकपाळ यांनी मोते यांना केला. गणेशोत्सव हा हिंदूंच्या भावनांशी निगडित असल्याने अशा महत्त्वाच्या मुद्दय़ावर चर्चेसाठी वेळ द्यायलाच हवा असे ते म्हणाले असता ‘एवढय़ा तातडीने तुम्हाला भेटायला मोठी आग लागली आहे की पूर आला आहे’ असे मुजोरीचे उत्तर मोते यांनी दिले. शिवसैनिकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी पोलिसांना बोलवले आणि शिवसैनिकांनी खुर्च्यांची तोडफोड केल्याचा आरोप केला.
गिरगावातील बहुतांश गणेशोत्सव मंडळे ही जुनी आहेत. उंच गणपती हे गिरगावचे भूषण आहे. त्यामुळे बऱयाच गणेशमूर्ती या मंडपातच घडवाव्या लागतात. गणेशमूर्ती बनवण्यासाठी मंडप उभारावाच लागतो आणि तो वेळेवर उभारल्याशिवाय मूर्ती घडवणे शक्य नाही. परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर पालिकेने वेळेवर परवानगी देणेही आवश्यक आहे- पांडुरंग सकपाळ
शिवसैनिकांना अटक आणि सुटका
गावदेवी पोलिसांनी यावेळी पांडुरंग सकपाळ, अरविंद बने, शिवाजी रहाणे, बाळा अहिरेकर, किरण बाळसराफ, शशांक सकपाळ, किरण शिंदे, हृषीकेश हळदणकर, विद्यानन राऊत यांच्यासह १६ जणांना अटक केली. त्यांना न्यायालयात उभे करण्यात आले. ऍड. राजन शिरोडकर यांनी या शिवसैनिकांची बाजू जोमाने मांडून न्यायालयाला वस्तुस्थिती सांगितली. त्यावर न्यायालयाने सर्व १६ जणांची जामिनावर मुक्तता केली.





























































