
इतर पक्ष साध्या साध्या निवडणुकाही गांभीर्याने घेतात, तशा आपणही घ्यायच्या… जर कोणी गद्दार असतीलच तर त्यांनी खुशाल शिवसेना सोडावी. जे निष्ठावान आहेत त्यांना घेऊन लढू!
जे देशात सत्तेत आहेत तेच आज आणीबाणीचे, गुलामगिरीचे वातावरण निर्माण करीत आहेत. पण असे गुलामगिरीचे वातावरण तयार करणे म्हणजे हिंदुत्व नव्हे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर जबरदस्त घणाघात केला. यांचे हिंदुत्व म्हणजे सत्तेसाठी अंगिकारलेले एक ढोंग आहे. वाघाचे कातडे पांघरलेले गाढव किंवा शेळी असते तसे त्यांनी हिंदुत्वाचे कातडे पांघरले आहे, असा हल्लाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी केला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 96वी जयंती आणि ‘सामना’च्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज देशातीलच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱयातील शिवसेनाप्रेमी आणि शिवसैनिकांशी ऑनलाइन संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी या वेळी भाजपच्या हिंदुत्वाचा बुरखा तर टराटरा फाडलाच, पण जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचे तेज दाखवणार आहे, अशी ‘जडीबुटी’ही दिली.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना मागील वर्षीच्या भेटीची आठवण करून दिली. ते म्हणाले, खूप दिवसांनी आपण सर्व समोरासमोर येत आहोत. गेल्या वर्षी साधारणतः फेब्रुवारीत आपण ‘वर्षा’वर भेटलो. तेव्हा राज्यभर शिवसंपर्क मोहीम राबवायची हे आपण ठरवले; पण सगळे ठरले आणि कोरोनाची दुसरी लाट आली. साधारणतः दिवाळीच्या सुमारास मी ठरवले होते की, आता राज्यभर फिरायचे आणि तुमच्याशी संवाद साधायचा. पण माझे मानेचे दुखणे उपटले आणि त्याची शस्त्र्ाक्रिया करावी लागली. त्यातून बाहेर पडतोय, गाडे आता रुळावर येत आहे. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे हे शक्य झाले आहे.
…तर शिवसेनेची लाट आपण का आणू शकत नाही!
कोरोनाच्या लाटांमागून लाटा येताहेत तर शिवसेनेची लाट आपण का आणू शकत नाही. जर एक व्हायरस त्याच्या लाटा एकामागून एक आणत असेल तर आपल्याकडे एक प्रचंड तेजस्वी भगव्याचा वारसा आहे. आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाही, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केला.
शिवसेनेची बीजे रोवणाऱया सर्वांना माझे विनम्र अभिवादन
आज 23 जानेवारी, शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिवस. हा शिवसैनिकांच्या आयुष्यातील एक सण आहे. या दिवशी दर वर्षी शिवसैनिक प्रचंड संख्येने ‘मातोश्री’वर वाजतगाजत यायचे. शिवसैनिकांचा मातोश्रीवर ओघ सुरू असायचा. संध्याकाळी षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम असायचा. त्या कार्यक्रमात प्रमोद नवलकर नेहमी सांगायचे की, 23 जानेवारी, 19 जून आणि 13 ऑगस्ट हे शिवसैनिकांच्या आयुष्यातले महत्त्वाचे सण आहेत. ही जाणीव करून देणारे प्रमोद नवलकर यांचाही आज जन्मदिवस आहे. त्या नवलकर यांच्याबरोबरच शिवसेनाप्रमुखांचे जे साथीसोबती ज्यांनी खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र पिंजून काढला, शिवसेनेची बीजे रोवली त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करीत आहे. आज त्यांनी लावलेल्या त्या बीजाचं वृक्षात रूपांतर झालं आणि त्याची फळे आपण सर्व चाखत आहोत, असे सांगतानाच या दिवशी संध्याकाळी आपण एकत्र भेटायचं, तो आपला रिवाज मोडू द्यायचा नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
हे राजकारणातले गजकर्णी, राजकारण म्हणून काहीही खाजवताहेत
हे काळजीवाहू विरोधक कोणे एके काळी आपले मित्र होते हे नाही म्हटले तरी आपले एक दुःख आहे. याचे कारण आपण त्यांना पोसले. हो पोसलेच. गोरेगावच्या शिवसेनेच्या शिबिरात मी मागे जे म्हणालो होतो की, 25 वर्षं आपली युतीत सडली तेच माझे मत आणि भूमिका आजही कायम आणि ठाम आहे. पूर्वी शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, राजकारण म्हणजे गजकरण आहे. जेवढे खाजवावे तेवढी अधिक खाज येते. तसे हे राजकारणातले गजकर्णी राजकारण म्हणून काही खाजवताहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांची अक्षरशः पिसे काढली.
आव्हान द्यायचे आणि मागे ‘ईडी’ची पिडा लावायची हे शौर्य नाही
आतासुद्धा आपल्यावर टीका करताना सांगतात की, तुम्ही आमच्यासोबत युतीत लढलात. हा लोकशाहीचा अपमान आहे. मध्यंतरी त्यांचे नेते अमित शहा पुण्यात येऊन गेले आणि आपल्यावर टीका करून गेले. आपल्याला सांगितले की, हिंमत असेल तर एकटय़ाने लढा. मी दसऱयाच्या मेळाव्यात तेही आव्हान स्वीकारले आहे. एकटय़ाने लढण्याची आमची तयारी आहे. शिवसैनिक आहोत, मर्द आहोत, आम्ही षंढ नाही. आम्ही एकटय़ाने लढू. वीरासारखे लढू! पण ही लढाई करताना तुमचे अधिकार आहेत ते तुम्ही वापरायचे नाहीत. आम्ही आमचे अधिकार सत्ताधारी म्हणून वापरणार नाही. हिंमत असेल तर कार्यकर्ते आणि कार्यकर्ते – पक्ष म्हणून राजकारणात जसे भिडतात तसे भिडा. मग बघून घेऊ आम्ही की कोण सरस आहे! पण आव्हान द्यायचं आणि मग मागे ‘ईडी’ची पिडा लावायची हे शौर्य नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
भाजपच्या आयुष्यात जो दिवस आला, तो आमच्याही आयुष्यात येईल
आपण सर्वत्र म्हणजे इतर राज्यातही आता निवडणुका लढवत आहोत. जे काही होईल ते होईल. पण खरं हिंदुत्व काय आहे हे घेऊन आपण पुढे जायचं आहे. हार होईल किंवा जीत होईल, ठीक आहे होऊ द्या. आपण विजयी झालो म्हणून डोक्यात उन्माद जाता कामा नये आणि हारलो तरी पराजयाने खचून जाता कामा नये. आम्ही लढणार. आणि आम्ही बघू बाहेरच्या राज्यांत आम्ही किती दिवस हरू… एक दिवस तोही येईल. जसा भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यात आलेला आहे. तसा आमच्याही आयुष्यात येईल आणि आम्ही तो आणू… एवढी जिद्द आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी दिलेली आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी या वेळी व्यक्त केला.
ती जिद्द आपल्यात असायला हवी!
जर त्या हातात बळ नसेल तर कितीही हात एकत्र आणले तरी काही होऊ शकत नाही. संधी मिळाली आहे त्या संधीचे सोने करा. आपण लढय़ात कधीच मागे पडलो नाही. लढणारा एकच पक्ष महाराष्ट्रात आहे. वाघ हा वाघासारखा जगला पाहिजे. शंभर दिवस शेळीचे जीवन जगण्यापेक्षा बंगालच्या वाघिणीकडे बघा, तिलासुद्धा चारी बाजूने घेरलं होतं. पण तिने कसा पंजा मारला. ती एक जिद्द आपल्यात असायला हवी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.
यावर मी समाधान मानणार नाही!
नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल लागल्यानंतर एक गोष्ट खरी आहे की, एकतर आपण सर्वच जागा लढवलेल्या नव्हत्या. आपण काही ठिकाणी आघाडी केलेली होती, काही ठिकाणी आघाडी झालेली नव्हती. मग वर्तमानपत्रातून छापून आले की, शिवसेनेचे असे का होते. आम्ही मात्र या वेळेला ज्या जागा लढवल्या त्या पाहता आपण जास्त जागांवर निवडून आलेलो आहोत. युतीत लढलो होतो त्यापेक्षा जास्त आलेले आहेत. पण मी यावर समाधान मानणार नाही, असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
दिल्ली काबीज करण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करायलाच हवे
खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभा राहायला हवा ही इच्छा व्यक्त केली. तो तर राहायलाच हवा, तो उभा राहणारच. पण त्याचबरोबर दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दाखवले ते आपण पूर्ण करायलाच हवे. ते जर आपण करणार असू तर आपण करत असलेल्या या सर्व प्रयत्नांना अर्थ आहे, नाहीतर सर्व निरर्थक आहे, असे जबरदस्त आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना केले.
लवकरच महाराष्ट्र पिंजून काढणार
मधले दोन महिने शस्त्र्ाक्रियेनंतर उपचारामध्ये गेले. आताही फिजिओथेरपी सुरू आहे. पण लवकरात लवकर मी यातून बाहेर पडणार, महाराष्ट्र पिंजून काढणार आणि माझ्या तब्येतीची जे काळजी घेताहेत त्या काळजीवाहू विरोधकांना भगव्याचं तेज दाखवणार. जसे काळजीवाहू सरकार असते तसे हे काळजीवाहू विरोधक आहेत आणि स्वतःच स्वतःच्या काळजीने त्यांचा अंत होणार. त्यामुळे त्यांची चिंता करायची गरज नाही, असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केला.
भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्वाला सोडलेले नाही
त्या वेळी शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दिशा दाखवली की हिंदुत्वासाठी आपल्याला सत्ता हवी होती. पण हिंदुत्वासाठी सत्ता की सत्तेसाठी हिंदुत्व, असा सवाल यांना पाहिल्यानंतर पडतो. आज यांचे जे पोकळ हिंदुत्व आहे ते सत्तेसाठी पांघरलेले ढोंग आहे. यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलंय, हे 25 वर्षे यांना पोसल्यानंतर आपल्या लक्षात आले हे आपले दुर्दैव आहे. लोक आपल्यावर टीका करतात की, तुम्ही काय करता आहात. आम्ही हिंदुत्व सोडले असे म्हटले जाते. पण आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाऊ शकत नाही. हिंदुत्व सोडणार नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलेलं नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. त्रिवार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी टीकाकारांना ठणकावले.
लोकसभा, विधानसभा ज्या जिद्दीने लढवतो, तशी प्रत्येक निवडणूक लढा
आपलं एक काय चुकतं, आपण खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी… म्हणजे काय लोकसभा आणि विधानसभा ज्या जिद्दीने लढवतो, तेवढय़ा जिद्दीने इतर निवडणुका लढवत नाही. मग माझ्यासह आपले नेते असतील. आता आपले मंत्री आहेत, जिल्हाप्रमुख आहेत, ते या निवडणुकांकडे फारसं लक्ष देतात का? भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्या पद्धतीने साध्यासुध्या निवडणुकांकडे लक्ष देतात. त्यांचे मोठे नेते रिंगणात उतरून प्रत्यक्ष निवडणूक लढत नसले तरीदेखील त्यांच्या उमेदवारांना सर्वकाही मदत करतात तशी मदत आपल्याकडून होत नाही, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करतानाच लोकसभा, विधानसभा ज्या जिद्दीने लढवता त्या जिद्दीने प्रत्येक निवडणूक लढा, असे आवाहन केले.
गद्दारी करण्यापेक्षा बिनधास्त शिवसेना सोडा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचा कानमंत्र शिवसैनिकांना दिला. ते म्हणाले, मी माझ्यापासून सुरू करतो. मीसुद्धा तसं पाहिलं तर गुन्हेगार आहे. मीतरी कुठे फिरलो? या वेळचा भाग वेगळा आहे. पण इतर वेळेला मीसुद्धा तसं काही लक्ष दिलेलं नाही. नाही, आपल्या कोणत्या नेत्याने एखाद्दुसरा सोडला तर लक्ष दिलेलं आहे. आता हे यापुढे टाळले पाहिजे. गेल्या दोन वर्षांत दोन विधान परिषदा आपणच आपल्या हरलो. कशा हरलो? काही जण सांगतात, तुमच्यातच गद्दारी झाली. मला नाही वाटत… जे शिवसेनाप्रमुख म्हणायचे तशी आईचं दूध विकणारी औलाद आता आपल्यामध्ये आहे असे मला वाटत नाही. आणि असेल तर त्यांनी अशी गद्दारी करण्यापेक्षा बिनधास्तपणे शिवसेना सोडावी. बघून घेऊ आम्ही, जे शिवसैनिक कट्टर आहेत, त्यांच्या मदतीने त्या मूठभर शिवसैनिकांच्या हातात मी अभिमानाची आणि स्वाभिमानाची तलवार देऊन निवडणुका जिंकून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, असतील मूठभर, पण निष्ठावान आहेत. शेवटी लढाईमध्ये हार-जीत ठरते ती निष्ठावानांवर. म्हणून मूठभर असतील तरी चालतील. पण अशी वेळ अजून आलेली नाही. पण ही गद्दारी खरंच होते आहे का? गद्दारी नाही, पण दुर्लक्ष होत आहे.
शिवसेनाप्रमुखांनी सामान्य माणसांना मोठे होण्याचा मार्ग दाखवला – सुभाष देसाई
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस हा शिवसैनिकांसाठी नवीन ऊर्जा देणारा दिवस असतो. बाळासाहेबांना सुधारकांचा वारसा प्रबोधनकारांकडून मिळाला. ते राजकारणात, समाजकारणात व्यस्त असले तरीसुद्धा त्यांनी हा वारसा नजरेआड होऊ दिला नाही. शिवसैनिकांची एक निष्ठा आणि सेवा बघून त्यांना शिवसेनाप्रमुखांनी संधी दिली. म्हणून अत्यंत तळगाळातील सामान्य माणसांना संधी दिली आणि मोठे होण्याचा मार्ग दाखवला. शिवसेनाप्रमुखांनी विकासाचा विचार राज्याला दिला. आज पुण्याच्या एक कोटींपर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून शिवसेनाप्रमुखांची देण असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे त्यांच्या दूरदृष्टीची जाणीव करून देतो, अशा शब्दांत शिवसेना नेते उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला.

































































