शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त आज सामाजिक उपक्रम

683

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज मुंबईसह राज्यभरात सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, 10 रुपयांत भोजन, बालरुग्णांना फळेवाटप आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गिरगावात शाखेचे उद्घाटन
गिरगावच्या सी. पी. टँक माधवबाग येथील शिवसेना शाखा क्रमांक 220 या शाखेचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन गुरुवारी सकाळी 11.30 वाजता करण्यात येणार आहे. शाखेच्या उद्घाटन सोहळय़ाला अधिकाधिक शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाखाप्रमुख वैभव मयेकर आणि शाखा संघटक कल्पना भांबुरे यांनी केले आहे.

घाटकोपरमध्ये 10 रुपयांत भोजन थाळी
नवदुर्गा महिला उत्कर्ष मंडळाच्या वतीने गुरुवारी घाटकोपर पश्चिम, नित्यानंद नगर येथील नवतरुण विकास मित्रमंडळ, जागृत सिद्धगणेश देवस्थान येथे सकाळी 8 ते 11 या वेळेत दहा रुपयांत भोजन थाळी देण्यात येणार आहे. 25 जानेवारीला महिलांसाठी हळदीकुंकू, 26 जानेवारीला रक्तदान शिबीर, 27 जानेवारीला श्री हरिकीर्तन, श्री सिद्धगणेश प्रतिमेची पालखी मिरवणूक होणार आहे अशी माहिती नवदुर्गा महिला उत्कर्ष मंडळाच्या वतीने देण्यात आली.

बोरिवलीत शिवसेनेचा ‘सेवायज्ञ’
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना प्रभाग क्रमांक 6 च्या वतीने बोरिवलीत सेवायज्ञाचे आयोजन केले आहे. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रभाग क्रमांक 6 च्या वतीने तीन दिवसांच्या त्रिसेवा यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरात स्वच्छता राहावी यासाठी कचऱयाच्या डब्यांचे विनामूल्य वाटपही करण्यात आले. तसेच 22 जानेवारी रोजी प्रभागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तर 24 जानेवारी रोजी भगवती रुग्णालयात रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात येणार आहे. प्रकाश कारकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक हर्षद कारकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, उपविभागप्रमुख विनायक सामंत, विधानसभा संघटक बाळकृष्ण ढमाले उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शाखाप्रमुख प्रवीण कुवळेकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या