श्रीमान बाळासाहेब ठाकरे : चित्र आणि चरित्र, दुर्मिळ छायाचित्रांतून उलगडणार शिवसेनाप्रमुखांचे व्यक्तिमत्त्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व उलगडणारे अनोखे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ‘श्रीमान बाळासाहेब ठाकरे ः चित्र आणि चरित्र’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे. येत्या 17 ते 19 मेदरम्यान सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृह, मुंबई विद्यापीठ, फोर्ट येथे सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन रसिकांना विनामूल्य पाहता येईल.

मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, सार्थ प्रतिष्ठान आणि मुंबई न्यूज फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेबांचे विचार आणि कार्य समाजापर्यंत पोहोचवणे हा प्रदर्शनाचा उद्देश आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन 17 मे रोजी सकाळी 11 वाजता होईल. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

अध्यासन केंद्राने छायाचित्र प्रदर्शनाबरोबरच ‘स्वातंत्र्योत्तर मुंबई-जडणघडण व विकास’ या विषयावर छायाचित्र स्पर्धाही आयोजित केली आहे. या स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या छायाचित्रांचे तसेच स्पर्धेतील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शनदेखील याच प्रदर्शनामध्ये आयोजित केले जाणार आहे.

प्रदर्शनात काय

‘श्रीमान बाळासाहेब ठाकरे ः चित्र आणि चरित्र’ प्रदर्शनात प्रसिद्ध छायाचित्रकारांनी काढलेली बाळासाहेबांची दुर्मिळ छायाचित्रे पाहता येतील. बाळासाहेबांच्या राजकीय, सामाजिक, कला-क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील विविध मान्यवरांसोबत झालेल्या बैठका, जाहीर सभा या अनुषंगाने काढलेली दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात येतील. यासाठी आयोजकांमार्फत राज्यभरातील 100 छायाचित्रकारांची निवडक 15 छायाचित्रे मागवण्यात आली होती. यातील 1500 छायाचित्रांतील निवडक 70 छायाचित्रे प्रदर्शनात ठेवण्यात येतील. तसेच अध्यासन केंद्रामार्फत छायाचित्रकारांना सन्मानित केले जाणार आहे.