
मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पुतळा उभारण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी रोड, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये ही दिमाखदार वास्तू उभारण्यात येणार आहे. पुतळा निश्चितीच्या जागेबाबत आज सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या आणि झंझावाती कारकीर्दीला सलाम करण्यासाठी फोर्ट परिसरात त्यांचा नऊ फुटी भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टस् या इमारतीसमोरील महात्मा गांधी रोड, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात यावा असा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मांडला.






















































