
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काल बिहारमध्ये जे भाषण केलं त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच नागरिकांनी आताच जागृत होऊन विचार करण्याची वेळ असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, ‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या भाषणावरून भाजपची दिशा स्पष्ट होत आहे. सर्वच लोकांनी आता डोळे उघडून जिथे हे लोक देश नेऊ इच्छितात तिथे नेऊ द्यायचा की नाही हे आता देशातील सामान्य नागरिकांनी ठरवण्याची वेळ आली आहे. नड्डांची वक्तव्य ही देशाला हुकूमशाहीकडे नेणारं वक्तव्य आहे.’
भाजपचा वंश कुठून सुरू झाला?
एकीकडे भाजप वंशवाद संपवायला चालला आहे असे ते म्हणतात तर दुसरीकडे 20-30 वर्षे इतर पक्षातील लोक आपल्या पक्षात येत असल्याचे सांगतात. मग हा भाजपचा वंश कुठून सुरू झाला? त्यांचा वंश तरी कोणता? असा खणखणीत सवाल त्यांनी यावेळी केला.
हे गुलामगिरीकडे वाटचाल करणारी ही दिशा!
आज जे देशात सुरू आहे ते घृणास्पद आहे. अत्यंत निघृण आणि घृणास्पद. आपल्या सोबत येतील ते आपले हे मी समजू शकतो. मात्र आपले जे गुलाम होतील ते आपले. त्यांचं काम संपलं की नवीन गुलाम. हे गुलामगिरीकडे वाटचाल करणारी ही दिशा त्यांनी ठरवली आहे, त्याचा सगळ्यांना विरोध करायला पाहिजे, असंही त्यांनी सुनावलं.
भाजपचे दिवस फिरले तर काय होईल…
नड्डा हे त्यांच्या पक्ष वाढवण्यासाठीचं राजकारण करताहेत. राजकारणाची बुद्धीबळाशी तुलना होते. मात्र आजचं राजकारण हे फक्त बळाचं राजकारण झालं आहे. फक्त बळ तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही इतरांना संपवायला चालले असाल तर दिवस हे सर्वदा सारखे नसतात. दिवस एकदा फिरले तर काय होईल याचा विचार भाजपने करायला हवा, असा इशाराही त्यांनी दिला.
संजय राऊत यांचा मला अभिमान!
संजय राऊत यांचा मला अभिमान आहे. ते माझे मित्र आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना मी भेटून आलो. पत्रकार, शिवसैनिक आहे निर्भिड आहे. त्यांचा गुन्हा काय? जे तिकडे गेले आहेत आणि आमच्यावर टिका करताहेत त्यांच्याआजूबाजूला सत्तेचा फेस आहे, तो फेस दूर झाल्यावर त्यांना सत्य परिस्थिती कळेल, असेही ते म्हणाले.






















































