
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझा जवळचा संबंध होता. लेखक म्हणून घडण्यात मला त्यांची मोठी मदत झाली,’ अशी कृतज्ञता 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आज व्यक्त केली.
साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. ’मराठी भाषा कशी उत्तम आहे, हे समजून घ्यायचं असेल तर प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले ‘प्रतापसिंह आणि रंगोबापूजी’ हे पुस्तक वाचा, इतिहास समजून घ्या, असंही विश्वास पाटील म्हणाले.
मी जेव्हा ‘संभाजी’ कादंबरी लिहायला घेतली तेव्हा जंजिरासंदर्भात मला फक्त दीड ओळीची माहिती मिळाली. त्यावरून काsंडाजी फर्जंद यांच्या संदर्भात मी साठ पानांचे प्रकरण लिहिले. शिवसेनाप्रमुखांनी मला ‘मातोश्री’वर बोलावून दुसऱ्या मजल्यावर बसवून माझ्याकडून हे प्रकरण वाचून घेतलं. हे प्रकरण जबरदस्त असून ते दै. ‘सामना’च्या दिवाळी अंकात आले पाहिजे आणि नंतर ते छापून आले. ही माणसं मोठय़ा मनाची होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
आमची दखल घेणार की नाही?
‘छत्रपती संभाजी महाराजांविषयी अनेक साहित्यकृतीतून विष पसरविले गेले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिवाजी सावंत यांची ‘छावा’ आणि माझी ‘संभाजी’ ही कादंबरी महत्त्वाची ठरली. आमच्या या योगदानाची कोणी दखल घेणार आहे की नाही?’ असा प्रश्नही त्यांनी केला. थोरले शाहू महाराज यांच्यावर संशोधनात्मक लेखन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नेते गेले; पण लोक गेले नाहीत!
ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रघुवीर चौधरी हे संमेलनाच्या समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांचे भाषण होण्याआधीच नेतेमंडळी निघून गेल्यामुळे रघुवीर चौधरी नाराज दिसले. त्यामुळे ते जास्त बोललेही नाहीत. नेते गेले म्हणजे लोकही निघून जातील असे वाटले होते; परंतु लोक गेले नाहीत, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.

























































