
सेकंड हॅण्ड कारची विक्री करणाऱ्या स्पीनी कार कंपनीकडून फसवणूक झालेल्या एका ग्राहकाला शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षामुळे न्याय मिळाला असून या ग्राहकाने शिवसेनेचे आभार मानले आहेत.
स्पीनी कार कंपनीच्या जाहिरातीमधील भूलथापांना बळी पडून यश डोईपह्डे नामक ग्राहकाने स्पीनी कंपनीकडून फेब्रुवारीमध्ये सेपंड हॅण्ड गाडी खरेदी केली, परंतु गाडीत सातत्याने बिघाड होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डोईपह्डे यांनी कंपनीकडे वारंवार तक्रार देऊनदेखील कंपनी त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यास तयार नव्हती. त्यामुळे शेवटी त्यांनी शिवसेना भवन येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे तक्रार केली. त्याअनुषंगाने शिवसेना नेते, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार कक्षाचे सचिव निखिल सावंत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने स्पीनी कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयावर धडक दिली.
या शिष्टमंडळात कक्षाचे खजिनदार देविदास माडये, कार्यकारी सदस्य बबन सकपाळ, कक्ष विधानसभा संघटक भट्टू अहिरे, अॅड. उकेंद्र लोकेगांवकर, उपसंघटक विजय पवार, सतीश नाटेकर, शेखर यादव, सचिन भट्टे, संतोष गोलपकर आदी उपस्थित होते.
ग्राहकांची लूट त्वरित थांबवा
स्पीनीकडून ग्राहकांची होत असलेली लूट त्वरित थांबवावी, असे निवेदन या बैठकीदरम्यान देण्यात आले तसेच सोशल मीडियावरदेखील मोठय़ा प्रमाणात ग्राहकांच्या तक्रारी निदर्शनास येत आहेत. त्या सर्व तक्रारींची दखल कंपनीने घ्यावी अशी सूचना कक्षाच्या वतीने कंपनीचे मुंबई व्यवस्थापक राहुल कामत व नंदन विराटकर यांना करण्यात आल्या. त्यावर घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून ग्राहकांना योग्य न्याय देऊ असे आश्वासन स्पीनी व्यवस्थापनाने दिले.