शिवसेनेने रचला दहीहंडी स्पर्धेच्या सलामीचा थर, मुंबईतील 24 पथकांचा सहभाग; संयुक्त चाळ पथकाची बाजी

शिवसेनेच्या वतीने दक्षिण-मध्य मुंबईत आयोजित ‘सांस्कृतिक कला व खेळ महोत्सव’अंतर्गत दहीहंडी स्पर्धा मोठय़ा जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत 16 पुरुष आणि 8 महिला गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. पुरुष गटात संयुक्त चाळ गोविंदा पथकाने तर महिला गटात जिजामाता गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकावला.

शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्पृतिक कला व खेळ महोत्सव याअंतर्गत ही दहीहंडी स्पर्धा प्रभादेवी येथे पार पडली. दहीहंडीला खेळाचा अधिकृत दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच मुंबई शहरात अशा स्वरूपाची मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली.

स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 25 हजार, 20 हजार, 15 हजार, 10 हजार अशी बक्षिसे देण्यात आली. ही भव्य स्पर्धा महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडली. असोसिएशनचे अध्यक्ष बाळा पडेलकर, कार्याध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, सचिव गीता झगडे, खजिनदार डेव्हिड फर्नांडिस तसेच अभिषेक सुर्वे, विनोद झगडे, विवेक नाक्ती, विनायक बांदेकर, संदीप काणेकर, प्रसाद अहिर, सचिन खेतले, राजेश सोनवडेकर, अभी सालावकर, संदेश महाडिक आणि चेतन बेलकर यांनी संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

आर्यन गोविंदा पथकने स्पॅनिश पद्धतीने रचले सहा थर 

दहीहंडी स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते जोगेश्वरीच्या आर्यन गोविंदा पथकाने. या पथकाने स्पेनमधील ‘Castell’ म्हणजेच मानवी मनोऱ्यांच्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत सहा थर रचले. प्रेक्षकांनी या अनोख्या प्रयोगाला दाद दिली. गोविंदा संस्पृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या या पथकाला विशेष सन्मानित करण्यात आले.

यांनीही मारली बाजी 

पुरुष गटात रणझुंझार गोविंदा पथक द्वितीय, श्रीकृष्ण गोविंदा पथक तृतीय आणि अभिनंदन गोविंदा पथक चतुर्थ स्थानी राहिले. महिला गटात श्री गणेश मुलींची शाळा द्वितीय, हिरकणी गोविंदा पथक तृतीय आणि आई एकवीरा गोविंदा पथक चतुर्थ स्थानी राहिले. स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी रिदम डान्स अॅकॅडमीने दहीहंडी गाण्यावर आकर्षक नृत्य सादर केले. या ग्रुपलाही विशेष सन्मान आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.