सायबर गुन्ह्यांसाठी कठोर उपाययोजना करा, शिवसेनेची विधान परिषदेत मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात सगळे जग संकटात असतानाही अशा बिकट परिस्थितीत सायबर गुन्हे आणि गुन्हेगारांचा मात्र सुळसुळाट झाला आहे. कोरोनाची औषधे, सूचना देण्याच्या निमित्ताने ई-मेल पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. लोकांची कमाई काही सेकंदांत गायब करणाऱया सायबर गुन्हेगारांना आळा घाला, त्यासाठी कठोर उपाययोजना करा, अशी मागणी विधान परिषदेत विशेष उल्लेख सूचनेद्वारे शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी केली.

कोरोनामुळे लोकांचा रोजगार, नोकरी गेली आहे. व्यवसाय बंद पडले आहेत. मात्र सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. फोन करून, ई-मेल करून पासवर्ड आणि इतर अन्य तपशील चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. बोगस जाहिरातींद्वारे लोकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारला जात आहे. गेल्या वर्षभरात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली बेरोजगार युवक व युवतींना फसवण्याच्या सर्वाधिक घटना मुंबईत घडलेल्या आहेत. गेल्या 11 महिन्यांत दाखल करण्यात आलेल्या 1,021 गुन्ह्यांपैकी अवघ्या 127 गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबईतील सायबर गुह्यांना आळा घालण्यासाठी, गुह्यांचा तपास जलद गतीने करण्यासाठी कठोर उपाययोजना करून मुंबईकरांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित करावे, अशी मागणी विलास पोतनीस यांनी विधान परिषदेत केली.

कोरोना काळात नववी आणि अकरावी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी होणार; परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ

कोरोना काळामुळे परीक्षा न घेता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पास करून अनुक्रमे दहावी आणि बारावीत पाठवण्यात आले, मात्र या विद्यार्थ्यांची नोंद शिक्षण मंडळाने केलेली नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीत गेलेल्या या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचे परीक्षा अर्ज भरता येत नाही. या मुलांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी या विद्यार्थ्यांची नोंद लवकरात लवकर करण्याचे आदेश शिक्षण विभाग मंडळाला द्यावे आणि बोर्डाला या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ देण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी विलास पोतनीस यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केली. याला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोना काळात नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या नोंदी लवकर कराव्यात आणि अशा दहावी आणि बारावी गेलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस आधीपर्यंत ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची परवानगी देण्याचे निर्देश वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाला दिले.