
सामना प्रतिनिधी । ठाणे
मद्याचे प्याले रिचवत डिजेच्या दणदणाटात नववर्षाचे झिंगाट स्वागत करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू असतानाच शिवसेना ठाणे जिल्हा शाखेने अभिनव उपक्रम आखला आहे. नवीन वर्षाचे स्वागत मध्यरात्री 12 वाजता रक्तदानाने करण्यात येणार असून त्यासाठी ठाणे जिह्यासह विविध भागांतून असंख्य तरुण येणार आहेत. पाश्चात्य संस्पृतीचे अनुकरण करण्यापेक्षा रक्तदान केल्यास नव्या वर्षाचे खऱ्या अर्थाने स्वागत होईल, असा प्रचार यानिमित्ताने केला जाणार आहे.
शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या रक्तानंद ग्रुपच्या माध्यमातून गेली 23 वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत असून यंदाचे 24 वे वर्ष आहे. शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने सोमवार 31 डिसेंबर रोजी तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हे रक्तदान शिबीर होणार आहे. ठाणे जिह्यासह वाडा, नाशिक, नगर, धुळे, पनवेल, पुणे, सोलापूर, संभाजीनगर, कोल्हापूर, अकोला येथेदेखील हा उपक्रम राबवण्यात येतो.
ठाण्यात होणाऱ्या या अनोख्या रक्तदान शिबिरास राज्याच्या विविध भागांतून शिवसेनेने तसेच रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा रक्तदान यज्ञ पार पडणार आहे. गेल्या 23 वर्षांत 25 हजारांहून अधिक रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या. हे रक्त रुग्णालये तसेच विविध रक्त पेढय़ांना पुरवण्यात आले असून रुग्णांना जीवदान मिळाले असल्याची माहिती रक्दानंद ग्रुपचे भुपेंद्र अहिरे यांनी सांगितले.


























































