
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांकडून सशुल्क उमेदवारी अर्जांबाबत कोणतीही प्रक्रिया शिवसेनेकडून करण्यात आलेली नाही, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नावाने अमरावती जिह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आल्याचे समजते. तसेच या अर्जांसमवेत निवडणूक निधी, पक्षनिधी आणि इतर खर्च यासाठीसुद्धा रक्कम घेण्यात येणार आहे असे समजते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, शिवसेना भवन येथून कोणतीही परवानगी न घेता आणि सदर अर्जावर जिल्हाप्रमुखाचे नाव न लिहिता अशा पद्धतीने इच्छुक उमेदवारी अर्ज छापणे, त्याचे वितरण करणे, इच्छुकांकडून रक्कम स्वीकारणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. अशा पद्धतीने इच्छुक उमेदवारी अर्ज आणि रक्कम स्वीकारली गेली असल्यास ती तत्काळ परत करावी. इच्छुक उमेदवारी अर्जाबाबतची कोणतीही प्रक्रिया शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेली नाही, याची नोंद सर्व पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.