
‘शिवसैनिकांचा कडवा विरोध मी अनुभवला आहे. त्याच शिवसैनिकांची मायेची उब आज मी अनुभवत आहे. जिवाचे रान करणाऱ्या शिवसैनिकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. शिवसैनिकांची ताकद मला हजार हत्तीचं बळ देते. माझा विजय हा मोठ्या मताधिक्याचा असणार आहे. हा आत्मविश्वास घेऊन मी अर्ज दाखल केला आहे. निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू’, असा निर्धार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी बीडमध्ये प्रचंड रॅलीतून भगवी लाट निर्माण करत त्यांनी जनसागरासमोर आशीर्वाद मागितले.
बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शक्ती प्रदर्शन करत विराट रॅली मार्गस्थ झाली. गावागावातून शिवसैनिक बीडमध्ये दाखल झाले होते. भगवा हातात घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरला होता. शहरातील रस्ते भगवेमय झाले होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संपूर्ण शहर आज दणाणून गेले होते.

रॅली माळीवेस, कारंजा रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामार्गे सभास्थळी दाखल झाली. उपस्थित हजारो मतदारांसमोर बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले, शिवसैनिकांची ताकद मला हजार हत्तीचे बळ देऊन जाते. त्यांचा कडवा विरोध मी बघितला आहे आणि त्यांचे उबदार प्रेमही मी अनुभवले आहे. मला माझ्या मोठ्या मताधिक्याने विजयाची खात्री आहे. माझ्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या तमाम शिवसैनिकांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. समोर बसलेल्या जनसागराची पाच वर्षे सालगडी म्हणून काम करणार आहे. निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू असेही ते म्हणाले

राष्ट्रवादीवर टिका करताना जयदत्त क्षीरसागरांनी पुढे म्हटले ते लोकांचे घर फोडायला निघाले होते. त्यांची घराची काय अवस्था झाली उभ्या महाराष्ट्राने त्यांची नाटके टिव्हीवर बघितली. परळीपासून बीडपर्यंत आणि बीडपासून मुंबईपर्यंत फोडाफोडी करणाऱ्यांची कशी फोडाफोडी झाली. शेवटी जे पेराल ते उगवते हेच नियतीने दाखऊन दिले आहे.

यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब आंबुरे, संपदाताई गडकरी, जयिंसग चुंगडे, हनुमान पिंगळे, सर्जेराव तांदळे, योगेश क्षीरसागर, दिलीप गोरे आदी उपस्थित होते.


























































