
शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर चारकोप कांदिवली पश्चिम विभागात अखरे आजपासून पाणीपुरवठा सुरळीत झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या विभागात अनियमित आणि अपुर्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेविका शुभदा गुढेकर यांनी पालिका प्रशासनाकडे नियमित पाठपुरावा केला. यानंतर आज दुपारपासूनच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून चारकोपमध्ये पाणीपुरवठा अनियमित होत होता. यातच मुंबईत १२ ऑक्टोबर रोजी वीजपुरवठ्यात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठ्यावर आणखीनच परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर विभागप्रमुख सुधारकर सुर्वे, नगरसेविका शुभदा गुढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख निखिल गुढेकर यांनी स्थानिक सोसायटींमधील रहिवाशांसह वॉर्ड ऑफिसरला अपुर्या-अनियमित पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे स्थानिक भाजप आमदाराच्या हस्तक्षेपामुळेच संबंधित विभागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप शिवसेनेने केला. कोरोनाचा प्रभाव असताना अपुर्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची झालेली गैरसोय प्रशासनाच्या निदर्शनास आणून तातडीने कार्यवाही करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. याची दखल घेत दुपारी २.३० वाजल्यापासूनच संपूर्ण विभागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. यावेळी नगरसेवक शंकर हुंडारे, विभाग संघटक संतोष राणे, उत्तर भारतीय जिल्हा प्रमुख कमलेश यादव, नंदू मोरे, रवी आपा, शाखाप्रमुख निखिल गुढेकर, अनंत नागम, श्याम मोरे, माजी नगरसेवक अविनाश पेडणेकर आदी उपस्थित होते.



























































