राजकारणात उभं केलं, 6 वेळा आमदारकी अन् मंत्रिपदही दिलं तरी गद्दारी? आदित्य ठाकरेंचं पळपुट्यांवर शरसंधान

‘शिवसेनेने ज्याला राजकारणात ऊभे केले. 6-6 वेळा आमदारकी अन् मंत्रिपदही दिले… तरीसुद्धा पक्षाशी बेइमानी का केली असेल ?’ असा प्रश्न युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बिडकीनच्या संवाद यात्रेत विचारला. तेव्हा “50 खोके एकदम ओक्के !” अशा घोषणा देण्यात आल्या. “गद्दाराने दारुच्या 9 दुकाना उघडल्या !” असेही श्रोत्यांनी सांगताच “अहो 9 नव्हे आता 12 झाल्या आहेत… दुकानांवर ग्राहक थांबावा म्हणून रस्त्यांवर स्पिडब्रेकर्स लावले आहेत… परंतु थोडे थांबा. जनताच हे गतीरोधक तोडणार असून आपल्या सत्तेच्या माध्यमातून गतीमान विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे !” असे दणदणीत आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमुक्ती दिली. आम्ही नंतर शेताच्या बांधांवर जाऊन पिक नुकसानीची पाहणी केली. परंतु तुम्ही राज्याच्या कृषिमंत्र्यांना कधी पाहिले आहे का? प्रोत्साहन अनुदान व नुकसान भरपाई देण्यात आली का?” असे विचारले असता “नाही-नाही” असे उत्तर आले. शेतकरी, शेती व कृषी क्षेत्रातील आजची प्रतिकुल परिस्थिती अधोरेखित करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रश्न विचारला की, “आपल्या पुढच्या पिढीला शेती व्यवसायात टाकावे. असे वाटते का ?” यावर उपस्थितांनी एकसाथ नकार दिला. परंतु “शेतकऱ्यांना घरकुल नाही… पण गद्दाराने 30 कोटींचा बंगला बांधला. महागड्या गाड्या घेतल्या !” असे काही श्रोत्यांनी सांगताच पुन्हा “50 खोके एकदम ओक्के !” च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

प्रास्ताविक शिवसेना सरपंच अशोक धर्मे यांनी तर मनोगत तालुकाप्रमुख मनोज पेरे यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, अशोक पटवर्धन, राजू वैद्य, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, महिला आघाडी जिल्हासंघटक राखी परदेशी, उपजिल्हाप्रमुख अंकुश रंधे, युवासेना जिल्हा अधिकारी शुभम पिवळ, तालुका अधिकारी विकास गोर्डे, शहर अधिकारी अजय परळकर, प्रकाश वानोळे व राणा मापारी हजर होते.