
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाला सातारा जिल्ह्यात प्रारंभ झाला असून, जिल्ह्यात एक लाख सभासद नोंदणीचे उद्दिष्ट आहे. ते आपण सर्वांनी मिळून पूर्ण करायचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते व सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.
कराड येथे आयोजित कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात बानुगडे-पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख हर्षद कदम, तालुका संपर्कप्रमुख शंकर सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याला उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद, सुनील पाटील, महिला आघाडीच्या अनिता जाधव, तालुकाप्रमुख शशिकांत हापसे, शहरप्रमुख शशिराज करपे, युवा सेनेचे जिल्हा संघटक कुलदीप क्षीरसागर उपस्थित होते.
नितीन बानुगडे म्हणाले, नजीकच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शिवसेनेच्या वतीने प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचे काम सुरू आहे. हे काम महत्त्वाचे असून, शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने प्रतिज्ञापत्र भरून द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेनेचा जन्मच मुळात संघर्षातून झाला आहे. स्थापनेनंतर शिवसेनेने अनेकदा संघर्ष अनुभवला आहे; पण त्यातून शिवसेना कमकुवत झाली नाही, तर नव्या जोमाने पुन्हा उभी राहिली. यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्वास बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केला.
हर्षद कदम म्हणाले, ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठय़ा विश्वासाने माझ्यावरती पुन्हा जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तळागाळापर्यंत जाऊन शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’



























































