
कोकणाचा महत्त्वाचा व्यवसाय असणारा आंबा उद्योग अवकाळी पाऊस, हवामान बदल, तीव्र धुक्यामुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत केली. यावर मंत्री भरत गोगावले यांनी कोकणच्या आंबा बागांचा तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
या वर्षी हवामानात तीव्र बदल, कीड-रोगांचा प्रभाव यामुळे शेतकरी हैराण झाला असताना सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने सुनील शिंदे यांनी लक्षवेधी मांडून आंबा बागायतदारांची समस्या मांडली. यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनीदेखील प्रक्रिया उद्योगांना तुटपुंजे अनुदान मिळत असून वाढीव अनुदान देण्याची मागणी केली. तर मंत्री गोगावले यांनी कोकणातील आंबा, काजू, फणस आणि कोकम यांच्या प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


































































