
नाशिकमध्ये शिवसेना, मनसेसह आघाडीच्या शिलेदारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. शहरासोबतच नाशिक रोड, पंचवटीसह महापालिका क्षेत्रातील मळे परिसरात शिवसेनेचाच जयघोष घुमत आहे. बळीराजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद विजयाची ग्वाही देत आहे.
शिवसेना, मनसेसह राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्रभाग विकासाचे व्हिजन घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. समस्यांचे निराकरण करून खऱ्या अर्थाने ते विकासाचे स्वप्न साकार करतील, असा विश्वास जनतेत आहे. शहरातील कॉलनी परिसरासारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद मळे भागातही शिवसेनेच्या शिलेदारांना मिळत आहे. बांधांवरून पायी चालत जाऊन बळीराजाची भेट घेत संवाद साधला जात आहे.
नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक 19 मधून शिवसेना उमेदवार भारती अंबादास ताजनपुरे, रूचिरा संतोष साळवे, योगेश वामन भोर हे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी ओढा रोड, एकलहरे रोड, चाडेगाव, चेहेडी शिव, ताजनपुरे मळा, अस्वले मळा, मगर मळा, भोर मळा, अरिंगळे मळा, भालेराव मळा या परिसरात जोरदार प्रचार केला. सर्वच ठिकाणी जनतेने त्यांचे स्वागत करून पाठिंबा दिला. यावेळी युवासेना जिल्हा युवाधिकारी राहुल ताजनपुरे, अंबादास ताजनपुरे, संतोष साळवे, वामन भोर, केशव बोराडे, सुनील बोराडे, सुनील खर्जुल आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्रभाग विकासासाठी वचनबद्ध- ताजनपुरे
महिला सक्षमीकरण, सुरक्षेसोबतच स्वच्छता, आरोग्य, शिक्षण सुविधांसाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही भारती ताजनपुरे यांनी दिली. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता यावे असा प्रभाग मी घडवणार आहे, विश्वासाचे हे नाते कायम जपणार आहे, असेही त्या म्हणाल्या.



























































