
‘दिलेला शब्द 100 टक्के पाळतात अशी ठाकरे परिवाराची ओळख आहे. त्यामुळे ठाकरे परिवाराला खोटं पाडण्यात येणं हे खपवून घेतलं जाणार नाही. विधानसभा निवडणुकांनंतर भाजपकडून विश्वासार्हतेला तडा दिला आहे’, अशा खणखणीत शब्दात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपली भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद सावंत यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने मला पंतप्रधान मोदींच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं. माझ्याकडे अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले होते. खरंतर लोकसभे आधीच युती टिकणार की नाही असे वातावरण होते. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन शब्द दिला होता. त्यांच्यात आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात जे ठरलं होतं ते निवडणूक निकालानंतर अमान्य करण्यात आलं. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडून विश्वासार्हतेला तडा गेला. इतकंच नाही तर असं काही ठरलंच नव्हतं असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुखांनाच खोटं पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. त्यामुळे शिवसैनिकात संताप निर्माण झाला. आता अशा परिस्थितीत जेव्हा महाराष्ट्रात नवं सरकार येणार आहे तेव्हा मी केंद्रीय मंत्रिपदावर राहणं हे नैतिकतेला धरून राहणार नाही, म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सोपवला आहे, असेही अरविंद सावंत यांनी सांगितले.

























































