ओमराजे ठरले देवदूत… पुरातून कुटुंबाला वाचवले

धाराशीव जिल्ह्यात अतिवृष्टीने अनेक नद्यांना पूर आला आहे. शेतात पाणी शिरल्याने हाती आलेले पीक वाहून गेले आहे. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात लोक अडकून पडलेत. अशा परिस्थितीत जिवाची पर्वा न करता शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिवाची बाजी लावून स्वतः पाण्यात उतरले. पूरग्रस्तांसाठी ते देवदूत ठरले.

परांडा तालुक्यात वडनेर येथे पूर्णपणे पाण्याने वेढलेल्या घरात एक आजी आणि तिच्या दोन वर्षांच्या नातवासह दोन व्यक्ती रात्रभर अन्नपाण्याविना अडकून पडले होते. कुणीतरी मदतीला येईल आणि आपल्याला बाहेर काढेल या आशेवर ते पाण्यात तग धरून होते. ती माहिती मिळताच खासदार ओमराजे तातडीने तिथे पोहोचले. त्यांनी एनडीआरएफच्या जवानांसह स्वतः कमरेपेक्षा जास्त वाहत्या पाण्यात उतरून आजी आणि नातवासह इतरांना सुरक्षित बाहेर काढले. पहाटे दोन वाजल्यापासून अडकून पडलेल्या त्या कुटुंबाला दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्यासोबत एका श्वानालाही वाचवण्यात आले.

उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

ओमराजेंचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर ओमराजे यांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ओमराजे यांना फोन करून त्यांचे कौतुक केले. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनीही ओमराजेंची पाठ थोपटली. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरूनही ओमराजे यांचे ‘बाळासाहेबांचा शिवसैनिक’ म्हणत कौतुक करण्यात आले आहे. ओमराजे निंबाळकर यांनी त्या थरारक प्रसंगानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता, अशी माहिती दिली. वडिलकीच्या नात्याने उद्धव ठाकरे यांनी आपली काळजी करणे साहजिकच आहे. आम्ही बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक आहेत. त्यामुळे जिथे सामान्य माणसाला अडचण पडेल तिथे कशाचीही पर्वा न करता झोकून देऊन काम करू, असे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले.

कैलास पाटीलही मदतीला धावले

पावसामुळे कळंब तालुक्यातील मलकापूरचा पाझर तलाव सांडव्यावरून वाहू लागला. पाझर तलाव फुटल्याचे कळताच आमदार कैलास पाटील यांनी रात्री तिकडे धाव घेतली. जेसीबीच्या मदतीने सांडव्याचे तोंड बुजवण्याचा प्रयत्न केला. येरमाळ्याच्या सिद्धार्थ नगर, गणेश नगर या वस्त्या पाण्याखाली गेल्या. तेथे रात्रीच लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आमदार कैलास पाटील यांनी पुढाकार घेतला.