
पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत मुसंडी मारत शिवसेनाच नंबर वन पक्ष ठरला. जिल्हा परिषदेच्या पाच तर पंचायत समितीच्या पाच जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी विजयाचा भगवा फडकवला. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ 18 वरून 20 झाले आहे. राष्ट्रवादीने 4, भाजप 4, माकप 1 तर अपक्षाने 1 जागा जिंकली. या निवडणुकीत भाजप-मनसे युती सपशेल अपयशी ठरली. त्यांच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव करीत गट आणि गणातही शिवसेनेच्याच उमेदवारांनी बाजी मारली. या पोटनिवडणुकीत प्रत्येक पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवली असली तरी जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बविआ आणि माकप अशी आघाडी असल्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ आता 42 इतके मजबूत झाले आहे.
पालघरमध्ये शिवसेनेच्या नीता पाटील व विनया पाटील विजयी होताच जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्यासह शिवसैनिकांनी जल्लोष केला.
मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी)- राज्यातील सहा जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. या निवडणुकीत भाजपला जबरदस्त फटका बसला असून पालघरमध्ये भाजप-मनसे युती कुचकामी ठरली आहे. पालघरमध्ये शिवसेनेला जबरदस्त यश मिळाले आहे. नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही भाजपचा धुव्वा उडाला आहे. ओबीसी आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी जबाबदार असल्याच्या मुद्दा मतदारांनीच खोडून काढला असून महाविकास आघाडीला मतदारांनी मतांचा कौल दिला आहे.
राज्यातील सहा जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी 5 सप्टेंबरला मतदान झाले. या निवडणुकीत सरासरी 63 टक्के मतदान झाले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत तसेच कोविडचे निर्बंध पोटनिवडणुकीसाठी लागू होत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर व पालघर जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान घेतले.
ओबीसींच्या मुद्दय़ावर भाजपला उत्तर
ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडीला सोडवता आला नाही. ओबीसी आरक्षण रद्द होण्याला महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे ओबीसी समाजाच्या नाराजीचा सामना महाविकास आघाडीला करावा लागेल, असा प्रचार भाजप नेत्यांनी केला होता. पण मतदारांनीच भाजपला सडेसोड उत्तर दिले आहे.
नंदुरबारमध्ये भाजपला फटका
नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला असून भाजपने तीन जागा गमावल्या आहेत. या जिल्हा परिषदेवर शिवसेना व काँग्रेसची सत्ता कायम राहिली आहे. भाजपच्या तीन जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे भाजपला मोठा फटका बसला आहे. कोपर्ली गटातून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा मुलगा विजयी झाला.
पंचायत समिती निवडणुकीतही फटका
जिल्हा परिषद निवडणुकीबरोबरच पंचायत समिती निवडणुकीतही भाजपला जबरदस्त फटका बसला आहे. भाजपच्या ताब्यातील शहादा व नंदुरबार या दोन्ही पंचायत समित्या काँग्रेस व शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत. शहादा पंचायत समितीतील 28पैकी 15 जागा काबीज करीत काँग्रेसची एकहाती सत्ता येणार आहे.
भाजपला धोबीपछाड
नंदुरबार पंचायत समितीमध्ये शिवसेनेने भाजपला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली आहे.
वाशीममध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व
वाशीममध्ये जिल्हा परिषदेच्या 14 जागांपैकी पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. शिवसेनेचे सुरेश मापारी विजयी झाले आहेत. शिवसेना सहा जागांवर कायम असल्याने ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी फायदेशीर झाली आहे.
ओबीसी समाजाने उत्तर दिले
हा आमच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी दिली. ओबीसी समाजावर भाजपने केलेल्या अन्यायाचे उत्तर मतदारांनी दिले, असे ते म्हणाले.
अकोल्यात वंचितची बाजी
अकोला जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे. चौदापैकी सहा जागा वंचितने जिंकल्या आहेत.
धुळ्यात भाजपने जागा गमावल्या
धुळे जिल्हा परिषदेच्या 15 जागांसाठी तर पंचायत समितीच्या 30 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. भाजपने बहुमत राखले असले तरी यापूर्वी जिंकलेल्या चार जागा भाजपला गमवाव्या लागल्या आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागांचा फायदा झाला आहे. काँग्रेसला एका जागेचा फायदा झाला आहे. महाविकास आघाडीमुळे भाजपला फटका बसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
भाजपला बसला असा फटका
या जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीत भाजपला कसा फटका बसला हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. ओबीसी आरक्षणामुळे भाजपच्या 31 जागा रद्द झाल्या होत्या. त्यापैकी भाजपला 22 मिळाल्या. याचा अर्थ भाजपला 9 जागा गमवाव्या लागल्या. काँग्रेसच्या 13 जागा रद्द झाल्या होत्या. मात्र काँग्रेसला 19 जागा मिळाल्या. शिवसेनेच्या 9 जागा रद्द झाल्या होत्या. मात्र या पोटनिवडणुकीत शिवसेनेला 12 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 जागा रद्द झाल्या होत्या. या जागा कायम राहिल्या आहेत.
नागपूरमध्ये भाजपचा गड कोसळला
नागपूर हा भाजपचा भक्कम गड मानला जातो. पण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून भाजपचा गड ढासळण्यास सुरुवात झाली आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला होता. माजी महापौर संदीप जोशी यांना पराभव पत्करावा लागला होता आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हापासूनच महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला होता आणि भाजप पिछाडीवर जाण्यास सुरुवात झाली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. या निवडणुकीत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे याच्याशिवाय भाजपचे इतर नेते सक्रीय दिसले नाहीत असे सांगण्यात येते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी जोरात प्रचार केला होता. त्यामुळे नागपूरमध्ये सोळा जागांपैकी नऊ जागांवर काँग्रेसला यश मिळाले, तर भाजपला तीन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे भाजपचा पुन्हा एकदा सपशेल पराभव झाला असून काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे.





























































