मला हा खटला निकालात काढायचा आहे! न्यायाधीशांनी केलं स्पष्ट, ऑगस्टमध्ये होणार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर सुनावणी

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. मला हा खटला निकालात काढायचा आहे, असे म्हणत न्यायमूर्तींना ऑगस्टमध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर सुनावणी घेऊ असे स्पष्ट केले. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेची मागणी

केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये शिंदे गटाला धनुष्यबाण व शिवसेना हे नाव वापरण्याबाबत दिलेला निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करावा, अशी मागणी शिवसेनेने नवीन अर्जाद्वारे केली आहे. 8 ऑक्टोबर 2022 रोजी निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना आणि शिंदे गटाला तीन पक्षचिन्ह सुचवायला सांगितली. त्यावेळी शिंदे गटाने स्वतःसाठी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) हे नाव सुचविले. ते आयोगाने नाकारले व ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव त्यांना दिले. शिंदे गटाने स्वतःच्या गटासाठी ‘त्रिशूल’, ‘गदा’ व ‘उगवता सूर्य’ या तीनपैकी एक चिन्ह द्यावे, अशी मागणी केली होती. त्यावर आयोगाने त्रिशूल व गदा हे धार्मिक चिन्ह असल्याने तर उगवता सूर्य हे इतर पक्षाचे चिन्ह असल्याने नाकारले. नंतर 11 ऑक्टोबर 2022 रोजी शिंदे गटाने सूर्य व ढाल तलवार असे चिन्ह स्वतःसाठी सुचविले. त्यावर आयोगाने शिंदे गटाला ‘ढाल तलवार’ हे चिन्ह दिले. त्यानुसार शिंदे गटाचे ‘ढाल-तलवार’ हे पक्षचिन्ह कायम ठेवून हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुनर्विचारासाठी वर्ग करावे. तसेच आयोगाचा अंतिम निर्णय होईपर्यंत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रस्थापित केलेले पक्षचिन्ह कुणीच वापरू नये, याबाबत निर्देश देण्याची विनंती शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.