
लोअर परळ येथील फिनिक्स पलेडियम मॉलमध्ये मोठय़ा प्रमाणात दुकाने, हॉटेल्स व थिएटर असल्याने येथे सतत ग्राहकांची येथे ये-जा सुरू असते. सदर मॉलमध्ये चार मजली पार्किंगची सोय आहे, तरीदेखील मॉल व्यवस्थापनाकडून क्षमतेपेक्षा जास्त पार्किंग दिली जात असल्याने येथील ग्राहकांना त्याचा मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर फिनिक्स मॉलमधील बेशिस्त पार्किंगवर आळा घाला, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने मॉल व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.
फिनिक्स मॉलमध्ये वाहनतळामधील पार्किंग फुल्ल झाल्यावर रॅम्पवर गाडय़ा पार्क करून त्यांच्याकडून पार्किंग चार्जेस घेण्याचे प्रकार मॉल व्यवस्थापनाकडून सुरू आहेत. यामुळे मॉलच्या आतमध्ये ट्रफिकच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. भविष्यात एखादा अपघात झाला तर अशा गैरवस्थापनामुळे मोठी जीवितहानी होण्याचीदेखील शक्यता आहे. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने सरचिटणीस विजय मालणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव निखिल सावंत यांच्या नेतृत्वात फिनिक्स मॉलचे वरिष्ठ व्यवस्थापक राहुल आंबेरकर यांची भेट घेतली. मॉलमधील गैरवस्थापनाबाबत त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, असे निवेदन कक्षाच्या वतीने देण्यात आले. याबाबत आंबेरकर यांनी होत असलेल्या गैरव्यवस्थापनाबाबत मॉलमध्ये सुरू असलेल्या कामाचे कारण दिले व लवकरात लवकर अतिरिक्त पार्किंगची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच रॅम्पवर होत असलेल्या पार्किंगबाबत माहिती घेऊन त्याबाबत लेखी उत्तर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाला देण्याचे आश्वासनदेखील सदर बैठकीत देण्यात आले.
सदर शिष्टमंडळात कक्षाचे खजिनदार देविदास माडये, कार्यकारी सदस्य बबन सकपाळ, वरळी विधानसभा कक्ष संघटक कृष्णकांत शिंदे, कार्यालय चिटणीस राजेश चव्हाण व राजेश पवार, कक्ष प्रसारक सुशील वर्मा, उपसंघटक विजय पवार, सुजित नलावडे, वॉर्ड संघटक महादेव शिवलकर, रामचंद्र वेमुला, संतोष जाधव, संतोष हिनुकले, ज्ञानेश्वर बोस व इतर कक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.






























































