
सामना ऑनलाईन । ठाणे
अंबरनाथ येथील मांगरूळ गावाजवळ झाडे जाळल्याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी ठाण्याच्या वन अधिकाऱ्यांच्या अंगावर जळालेल्या झाडांची राख फेकली. झाडे जाळल्याप्रकरणाची चौकशी करावी, तसेच जबाबदार वन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त आंदोलकांनी वनाधिकाऱ्यांच्या अंगावर राख फेकून घोषणाबाजी करत निषेध केला.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ येथे वनविभागाच्या 80 एकर जागेवर लोकसहभागातून एक लाख झाडांची लागवड केली होती. मात्र समाजकंटकांकडून वारंवार आग लावून ही झाडे जाळण्यात आली. वनविभागाकडून मात्र हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही त्यामुळे 70 टक्के झाडे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे या प्रकाराला वनविभाग जबाबदार असल्याचा आरोप करत संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केली आहे. या आंदोलनाप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलिसांनी खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह 100 पेक्षा जास्त आंदोलकांना ताब्यात घेतले.




























































