रेल्वे भरतीत अन्याय; मराठी तरुणांची पुन्हा परीक्षा घ्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,  मुंबई

पुण्याच्या नऱ्हे येथील रेल्वे भरतीच्या गुप डी पदांसाठीच्या भरती परीक्षेत 200 मराठी तरुणांना कागदपत्रे असूनही परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आले. याविरोधात शिवसेनेने आज रेल्वे भरती बोर्डावरच धडक दिली. भरती बोर्डाचे चेअरमन गोपाल  चंद्रा यांना जाब विचारून या तरुणांसाठी पुन्हा परीक्षा घ्या. तसे न झाल्यास शिवसेना याविरोधात जोरदार आंदोलन छेडेल, असा इशाराच यावेळी शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने देण्यात आला.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्यासह स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी रेल्वे भरती बोर्डावर धडक दिली. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणांनी रेल्वे भरती बोर्डाचे कार्यालय दणाणून सोडले. भरती बोर्डाचे चेअरमन गोपाल चंद्रा यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना जाब विचारण्यात आला. परीक्षार्थींकडे आधार कार्ड तसेच अन्य पुरावे असताना त्यांना परीक्षेला का बसू दिले जात नाही? उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी रेल्वे भरतीत स्थानिकांना सामावून घ्या असा तिथल्या राज्यांचा आग्रह आहे. तोच आग्रह महाराष्ट्रातल्या भरती प्रक्रियेत शिवसेनेचा आहे. येथील विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवून मागच्या दाराने यूपी, बिहारच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा हे खपवून घेणार नाही, असे खडे बोलच अनिल देसाई यांनी गोपाल चंद्रा यांना सुनावले. वारंवार होत असलेला हा अन्याय सहन केला जाणार नाही. जे विद्यार्थी भरती परीक्षेपासून वंचित राहिले आहेत त्यांची तत्काळ पुन्हा परीक्षा घ्या अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे निवेदनही देण्यात आले. यावेळी गोपाल चंद्रा यांनी दिल्लीतील रिक्रूटमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलणे केले. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, महासंघाचे पदाधिकारी आमदार सुनील शिंदे, प्रदीप मयेकर, अनिल चव्हाण, शरद जाधव, बापू पाटील, उमेश नाईक, गोपाळ शेलार, बाबी देव, मिलिंद घनकुटकर, रमेश गवळी, दिनेश बोभाटे, अरुण दुबे, राजू फोडकर, जयंत निमसूडकर, आबा मयेकर, हेमंत रासम आदी उपस्थित होते.

दिवाळीतील परीक्षा रद्द करा
यूपीमध्ये छटपूजा असली की त्या ठिकाणी रेल्वे कोणतीही परीक्षा घेत नाही, मात्र महाराष्ट्रात रेल्वे भरती परीक्षा ऐन दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी घेतली जाणार आहे. जो न्याय उत्तर प्रदेशला तोच न्याय महाराष्ट्रालाही असायला हवा. तेव्हा महाराष्ट्रात दिवाळीत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा रद्द करा आणि त्या नंतर घ्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याबाबतही आपण रेल्वे बोर्डाला कळवून योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन गोपाल चंद्रा यांनी दिले.