
सामना ऑनलाईन । शिऊर
दुष्काळाचा सामना करण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्य़ातील विविध चारा छावण्यांना शिवसेना नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने शिवसेनेच्या कतीने मदत करण्यात येत आहे. याचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. गंगापूर तालुक्यातील गोपाळवाडी या गावातील युवकांनी सुरू केलेल्या चारा छावणीचा शुभारंभ जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला. तसेच वैजापूर तालुक्यातील चारा छावण्यांना भेट देऊन पाण्याच्या 25 टाक्यांचे वाटप केले.
जय बजरंग व्यायामशाळेतील युवकांनी सुरू केलेल्या चारा छावणीस शिवसेनेच्या वतीने 5 हजार लीटर क्षमतेच्या पाण्याच्या 5 टाक्यांचेसुद्धा यावेळी वाटप करण्यात आले. जिल्हाप्रमुख दानवे यांनी यावेळी दुष्काळाचा सामना करण्यासाठी युवकांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून शिवसेनेच्या वतीने वेळोवेळी योग्य ती मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, तालुकाप्रमुख रमेश बोरनारे, सुभाष कानडे, व्यायामशाळेचे अध्यक्ष संदीप जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. वैजापूर तालुक्यातील खंडाळा, निमगाव, शिऊर व लोणी येथील चारा छावणीस शिवसेनेच्या वतीने पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कृउबा उपसभापती राजेंद्र चव्हाण, लक्ष्मण गायकवाड, नंदू पा. जाधव, सुनील पैठणपगारे, चांगदेव जाधव, महेश लिंगायत, सुनील पौळ, महेंद्र गंडे, पांडुरंग जगताप, गोरख नेमाने, दशरथ जगताप, ज्ञानेश्वर जगताप, गणेश जगताप, दत्तू जगताप, राम धोत्रे, नाना धोत्रे, भूषण राजपूत, सुदाम राजपूत यांच्यासह शेतकरी, शिवसैनिक व नागरिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.

























































