विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या खासगी शाळेतील शिक्षकाला पालिकेचे अभय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

घाटकोपरच्या शाळेतील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अभय देणाऱ्या शाळेवर कोणतीही कारवाई न करणाऱ्या पालिका प्रशासनाला शिवसेनेने चांगलेच धारेवर धरले. मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न असताना पालिका प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ का करीत आहे, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी पालिकेला खासगी शाळांच्या विषयात कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आल्याने सदस्यांनी आणखीनच संताप व्यक्त केला.

घाटकोपरच्या शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार नोव्हेंबर 2016 मध्ये घडला. यामध्ये मानसिक धक्का बसलेल्या विद्यार्थिनीने पूर्व परीक्षाही दिली नाही. या विद्यार्थिनीला जाणीवपूर्वक कमी गुण देण्यात आल्याचे शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले. या प्रकाराच्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाला अटकही करण्यात आली, मात्र काही दिवसांनी पुन्हा कामावर घेण्यात आले. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न असताना संबंधित शाळा अशा शिक्षकाला पुन्हा कामावर घेऊच कशी शकते, असा सवाल शीतल म्हात्रे यांनी केला. अशा शाळांना अभय देणाऱ्या शाळेवरच कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

शाळेच्या कारभाराची चौकशी करा
संबंधित शाळेमध्ये आयजीएससी बोर्डाची खासगी शाळा असून कॉलेज सुरू करण्याची परवानगी कोणत्या कायद्यान्वये दिली, असा सवाल शीतल म्हात्रे यांनी केला. सदर शाळेतील 100 शिक्षक काम सोडून गेले आहेत. त्यामुळे संबंधित शाळेतील सर्व कारभाराची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ
शाळा सुरू करणाऱ्या संस्थेला शिक्षण उप संचालक कार्यालयाकडून नमुना-1 नुसार परवानगी मिळत असली तरी शाळेची इमारत, वीज, पाणी, वर्गखोल्या, मैदान, ग्रंथालय आदी सुविधांबाबत पालिकेच्या बीट ऑफिसरच्या पाहणीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांकडून परवानगी दिली जाते. त्यामुळे पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शाळांमधील गंभीर आणि गैरप्रकारांबाबत कारवाई करण्याचा अधिकार असल्याचे साईनाथ दुर्गे म्हणाले. मात्र पालिका प्रशासन अशा शाळांवर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.