अहिल्यानगर महापालिकेतील 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणल्यामुळे सुडाने कारवाई, किरण काळे यांच्यावर खोटा गुन्हा

अहिल्यानगर महापालिकेतील रस्त्यांच्या कामातील 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणून भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक राजकारण्यांचा पर्दाफाश शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांनी केला. या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत असतानाच किरण काळे यांच्यावरच बलात्काराचा आरोप करत सुडाने कारवाई केली गेली आहे. 2023 साली घडलेल्या घटनेचा गुन्हा तब्बल 730 दिवसांनंतर दाखल करून काळे यांना सोमवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अभिजित पुप्पाल यांनी जोरदार युक्तिवाद केला. कायद्याचं राज्य आहे की नाही? असा सवाल करीत गुह्यातून काळे यांचे नाव वगळण्याची मागणी केली. न्यायालयाने काळे यांना 5 दिवसांची कोठडी सुनावली.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेले पत्र न्यायालयासमोर सादर

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले. या घोटाळ्यातील दोषींवर कारवाईची मागणी या पत्रात केली आहे. ही बाब काळे यांनी निदर्शनास आणून दिली. गेल्या दोन वर्षांपासून किरण काळे यांनी सातत्याने राज्यपालांपासून अनेकांना त्यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. महापालिकेतील जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक राजकारण्यांचा पर्दाफाश काळे यांनी केला. त्यामुळे राजकीय द्वेषातून, सुडाने ही कारवाई काळेंवर केली आहे. खोटा गुन्हा दाखल करून राजकीय दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे, असे अॅड. पुप्पाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.