डोंबिवलीतील स्मशानभूमीला टाळे, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखानपाडा, कोपर रोड आणि देवीचापाडा परिसरातील स्मशानभूमीला पालिकेने टाळे ठोकले आहे. आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून स्मशानभूमी खुली करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून स्मशानभूमी बंद आहे. पालिकेशी पत्रव्यवहार करूनही तसेच मागील महिन्यात डोंबिवली येथे आयोजित लोक अदालतमध्ये या विषयावर प्रत्यक्ष चर्चा करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांच्याशी संपर्क साधूनही स्मशानभूमीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे पुढील १५ दिवसांत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून स्मशानभूमी खुली न केल्यास बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे आणि उपशहरप्रमुख संजय पाटील यांनी दिला आहे.