
केंद्रातील भाजप सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन ऐन गणेशोत्सवात ठेवले आहे. येत्या 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान हे विशेष अधिवेशन होणार असल्याचे संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी जाहीर केले. त्यावरून सध्या भाजप सरकारवर टीकेची झोड उठली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील केंद्र सरकारला फटकारले आहे. ”वाह रे याचं हिंदुत्व. संसदेच्या इतिहासात कधीच संसदेचे सत्र झालेले नाही. नवरात्र असो किंवा गणेशोत्सव असो कधीच सणासुदीला संसद भरवली गेलेली नाही. आता यांनी गणपतीच्या सणामध्ये , ज्य़ा काळात गणपतीची आराधना केली जाते त्या काळात यांनी हे अधिवेशन ठेवले आहे. हा सण फक्त महाराष्ट्रात साजरा होत नाही तर संपूर्ण देशात, जगात साजरा होतो. हे यांचे हिंदुत्व आहे”, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.
संसदेचं पावसाळी अधिवेशन संपून काही दिवस उलटल्यानंतर आता पुन्हा पाच दिवसांचं ‘विशेष सत्र’ बोलावण्यात आलेलं आहे. हे विशेष अधिवेशन ऐन गणपतीत म्हणजेच 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान बोलावण्यात आलेलं आहे.


























































