
जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्यासह उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, बाबुराव पवार, अशोकराव आघाव, शिवाजी शेजुळ, हरिहर शिंदे, हरिभाऊ पोहेकर, बबनराव खरात, मुरलीधर थेटे आदींच्या प्रमुख उपस्थितीत जालना जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.
जालना जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद आदी पिके पूर्णतः हातची गेली आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेला सगळा खर्च यामुळे वाया गेला आहे. तसेच मोसंबी व इतर फळ पिकांची मोठ्या प्रमाणावर गळती झाली. पाऊस नसल्यामुळे अनेक गावे व तांड्या वस्तीवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या सर्वच तलावांच्या पाणी पातळीने तळ गाठला आहे. अशी एकंदरीत भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाण्या अभावी डोळ्यात देखत नष्ट होणारी पिके पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सन 2023 यावर्षी खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी जिल्ह्यातील 1,12998 शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून घेतलेले 1000 कोटी पेक्षा अधिक रकमेचे पीक कर्ज तात्काळ माफ करण्यात यावे. या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति हेक्टरी किमान 25000 व फळबागांना प्रति हेक्टरी 50000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी, जेणेकरून शेतकरी वर्ग आत्महत्याकडे वळणार नाही. शासन धोरणाप्रमाणे 21 दिवसांचा पावसाचा खंड पडल्यास पीक कंपन्यांनी शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम देणे आवश्यक आहे, प्रत्यक्षात 75 पेक्षा अधिक दिवसांचा मोठा खंड पडल्याने सदरील रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ देण्याच्या सूचना विमा कंपन्यांना द्याव्यात. भविष्यात निर्माण होणाऱ्या भीषण पाणी व चारा टंचाईच्या अनुषंगाने आताच योग्य ते सर्व नियोजन करण्यात यावे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीचे थकीत अनुदान शासनाने शेतकऱ्यांना द्यावे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान तात्काळ देण्यात यावे. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याकडील बँक, विज बिल व आदी वसुल्या थांबविण्यात याव्यात. ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांच्या हाताला काम मिळावे करिता रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी प्रभाकर उगले, सखाराम गिराम, उद्धव भुतेकर, अशोक खलसे,बाबुराव कायंदे, प्रभाकर घडलिंग, बबन मिसाळ, गंगुताई वानखेडे, शंकर जाधव, सुरेश वाघमारे, राजेश जाधव, जनार्धन गिराम, राजु जाधव, परमेश्वर डोंगरे, अमेर शेख, माऊली गोरे, गणेश राठोड, संतोष खरात, देशमुख, शेवाळे, प्रभाकर खरात, संदिप गोरे, उत्तम कल्हापुरे, दिलीप डोंगरे, भागवत गिराम आदींची उपस्थिती होती.

























































