मतदारसंघाच्या विकासासाठी विशेष निधी तातडीने द्या, ‘डीपीडीसी’ बैठकीत शिवसेना आक्रमक

मतदारसंघातील नागरी विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी आमदारांना निधी देण्याची मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत. पण पालक मंत्र्यांच्या माध्यमातून आतापर्यंत एक रुपयाचा निधी आलेला नाही. आमच्या मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी महापालिका व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी शिवसेना आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.

मुंबई जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिह्याचे पालक मंत्री व जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे होते. या वेळी शिवसेना आमदार अजय चौधरी व शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी अनुक्रमे शिवडी व भायखळा विधानसभा मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष वेधले. या वेळी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातील समस्या मांडल्या.

शिवडी-वरळी-नाव्हा शेवा प्रकल्प बांधितांचे पुनर्वसन व आचार्य दोंदे मार्गावरील पदपथांची तातडीने दुरुस्ती करावी. शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात यावी. भोईवाडा गावातील स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संस्थेचा रखडलेला पुनर्विकास तातडीने मार्गी लावावा, असे ते म्हणाले. गेल्या वीस ते बावीस वर्षांपासून घराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या गिरणी कामगारांना तातडीने घरे द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

आमदार निधी गेला कुठे?

जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये सातत्याने आमदार निधीची मागणी केली पण अद्याप एक रुपयांचा निधी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आलेला नाही. मुख्यमंत्री असताना निधी मंजूर केला, पण निधी कागदावरच राहिला. प्रत्यक्षात कामे झाली नाहीत. निधी गेला कुठे असा सवालही आमदार अजय चौधरी, मनोज जामसुतकर यांनी केली.

बीआयटी चाळींचा पुनर्विकास करा

शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी माझगाव ताडवाडीतील बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मांडला. विधिमंडळाच्या तीन अधिवेशात या प्रश्नावर आवाज उठवला आहे. बीडीडी आणि अभ्युदय नगरच्या धर्तीवर बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. बीआयटी चाळीत वर्षानुवर्षे राहणारे पालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस कर्मचारी यांना कायमस्वरूपी हक्काची घरे द्या, अशी मागणीही त्यांनी केली. कामाठीपुरा भागातील इमारतींचा समूह विकास, एनटीसी मिल चाळींचा पुनर्विकास, भायखळ्यातील पाणी टंचाई या समस्या सोडविण्याची मागणी जामसुतकर यांनी केली.