
मुंबईचे महापौरपद आणि मिंधेच भविष्य यांचा फैसला दिल्लीत होणार आहे. मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी दिल्लीला फेऱ्या माराव्या लागणे, हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आहे, असे स्पष्ट करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांना चांगलेच फटकारले आहे. तसेच दावोसमध्ये महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याच्या चर्चेऐवजी मुंबईच्या महापौरपदाची चर्चा होत असल्याचे सांगत त्यांनी भाजपवरही निशआणा साधला.
मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरवला जाईल, असे आपण आधीपासून सांगत आहोत. हे असे याआधी कधी घडले नव्हते. मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी मिंधेंना नेत्यांना अमित शहांच्या पायजवळ बसावे लागत आहे. मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी दिल्लीला फेऱ्या माराव्या लागणे, हा मुंबईचा, महाराष्ट्राचा अपमान आहे. दावोसमध्ये गेलेले मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्यात महापौरपदाचीच चर्चा होत आहे. त्यामुळे कागदावर दिसत असली तरी यंदा महाराष्ट्रात गुंतवणूक कमी येणार आहे, कारण उद्योगधंद्याला आणण्याऐवजी ते महापौरपदावर चर्चा करत आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला.
मिंधे आणि भाजप यांची सर्व गुंतवणूक सध्या मुंबई महपालिकेतील सत्ता आणि महापौरपद यांच्यातच होत आहे. महापौरपदासाठी त्यांच्याकडे आकडा असेल. त्यांच्याकडे चारचा आकडा आहे. ते चौकार मारतील तर आम्ही षटकार मारू, असे ते म्हणाले. मिंधेंना आपल्यासोबत ठेवायचे की नाही, याबाबत दिल्लीत लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रपूरबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तिथे आमच्या मदतीशिवाय कोणाचीही सत्ता स्थापन होऊ शकत नाही. एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला भाजप आहे. याबाबत स्थानिक समस्या, स्थानिक परिस्थिती पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील निवडणूका कशा घ्यायचा या निर्णय राज्य निवडणूक आयोगावर असतो. तेलंगणामध्ये स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, तिथे भाजप पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. कर्नाटकातही तेच चित्र दिसणार आहे. राज्यात मतदानावेळी शाई आणि मार्कर बदलावे लागले म्हणजे त्यात गडबड होती. या बनावट शाईमुळे त्यांचे काही नगरसेवक निवडून आले, असा आरोपही त्यांनी केला.





























































