
सर्वोच्च न्यायालयात गेल्या साडेतीन वर्षांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात आम्हाला न्याय का मिळत नाही, तारीखवर तारीख का मिळते, हे आता स्पष्ट झाले आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. त्यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या स्वागतासाठी मिंधे आणि अजित पवार उपस्थित होते. ते खटल्यातील पक्षकार आहेत. त्यांच्याकडून सरन्यायाधीशांनी सत्कार स्वीकारणे, हे संविधानविरोधी असल्याचे संजय राऊत म्हणाले.
न्यायालयीन व्यवस्थेबाबतचा विषयही गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यासमोर गेल्या साडेतीन वर्षांपासून शिवसेना कोणाची, चिन्ह कोणाचे, खरी शिवसेना कोणाची हा खटला प्रलंबित आहेत. त्यावर ते तारखांवर तारखा देत आहेत. स्वतःच तारीख ठरवतात आणि स्वतःच दोन महिने पुढे ढकलतात. त्यामुळे घटनाबाह्य पद्धतीने मिंधे गटाने आतापर्यंत चार निवडणुका लढवल्या. आता परत त्यांनी फायनल हेअरिंगसाठी तारीख दिली आणि ती पुढे ढकलली.
सरन्यायाधीश सूर्य कांत नुकतेच मुंबईत आले होते. राजशिष्टाचारानुसार त्यांच्या स्वागताला मुख्य सचिवांनी, अधिकारी वर्गाने जायला हवे. आतापर्यंत सरन्यायाधीशांच्या स्वागताला राजकारणी विमानतळार थांबले आहे, असे कधी दिसले नाही. मात्र, शिवसेना विरुद्ध शिंदे खटल्यतील एक पक्षकार असलेले ज्यांच्यासमोर खटला सुरू आहे, त्या सरन्यायाधीश सूर्य कांत यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी विमानाखाली उभे होते. सूर्य कांत यांनी तो हसतहसत स्वीकारला. हे संविधानविरोधी, घटनाबाह्य आणि अनैतिक आहे.
ताज पॅलेसमध्ये सूर्य कांत यांचा मुक्काम होता. त्यांची भेट मिळावी म्हणून शिंदे बराचवेळ तेथे थांबले होते. अशाप्रकारे देशात चालणार असेल तर देशातील न्यायव्यवस्थेवरील उरलासुरला विश्वास उडून जाईल. आम्हाला न्याय का मिळत नाही? आम्हांला तारखांवर तारखा का मिळतात हे काल स्पष्ट झाले. सूर्य कांत यांनी याबाबतची जाणीव ठेवायला हवी होती. सूर्य कांत यांना आगामी काळात राजकारणात यायचे असल्याने ते राजकारण्यांशी, राजकीय पक्षांशी लागबांधे ठेवत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.



























































