
मुंबई महापालिका निवडणुकीची आकडेवारी जारी करण्यात येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी मतमोजणीत काही अडचणी येत आहेत. त्यामुळे अंतिम निकाल हाती येईपर्यंत आकडेवारी बदललेली असेल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच आमच्या शिवशक्तीचे 90 पेक्षा जास्त उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मतदानाच्या आकडेवारीत मनसेच्या जागा सकाळपासून 9 दाखवत आहेत. आमच्या शिवशक्तीचे उमेदवार विजयी होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या आकडेवारीबाबत साशंकता आहे. तसेच अजूनही अनेक ठिकाणी मतमोजणी पूर्ण झालेली नाही. ही आकडेवारी प्रसारमाध्यमे नेमकी कशी दाखवत आहे. अनेक ठिकाणी मतदानयंत्रात बिघाड असल्याने मतमोजणी थांबली आहे. त्यामुळे काही ठिकाणचे निकाल येण्यास विलंब होणार असल्याची शक्यता आहे.
ईव्हीएममधील गडबडीच्या आरोपावर आम्ही ठाम आहोत. काल मतदानावेळी अनेकांना मतदानावेळी अडचण आली. तसेच आज मतमोजणीतही तांत्रिक बिघाड दिसून येत आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची आमची मागणी आहे. तसेच काल मतदानावेळीही अनेक मतदारांनी ईव्हीएम मशीन बिघाडाच्या तक्रारी केल्या आहेत. मतदार हे कोणत्या पक्षाचे नसतात आणि EVM मधील गडबडींसंदर्भात मतदार तक्रार करत असल्याने ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचा अंदाज आहे.
मतदानयंत्रातील बिघाड किंवा इतर कोणत्याही कारणाने मतमोजणी रखडली आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारी हाती येईपर्यंत त्यात बदल होण्याची शक्यता आहे. तसेच आमच्या विजयी उमेदवारांची संख्या 90 पेक्षा जास्त असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजप अन्य भाषिक व्यक्तीला महापौर करण्याच्या तयारी करत असल्याच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी आपल्या शैलित उत्तर दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी शिवशक्ती सभागृहात असताना गैरमराठी भाषिक महापौर करण्याची कुणाच्या बापाची हिंमत होईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.





























































