
महायुती सरकारमधील कलंकित, भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करावी आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे महाराष्ट्र देशभरात बदनाम होत असल्यामुळे राज्यातील जनतेला जागरूक करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवार, 11 ऑगस्ट रोजी राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर दुपारी 12 वाजता हे उग्र आंदोलन करण्यात येईल. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर होणाऱया आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. या आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेने केले आहे.
महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. मिंधे गटाचे आमदार व समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा 60 कोटींचा घोटाळा आणि 1500 कोटींचा गैरव्यवहार, कृषिमंत्री असताना माणिकराव कोकोटे यांचे रमीचे डाव आणि नुकसानग्रस्त शेतकऱयांबद्दल बोलताना ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वाह्यात प्रश्न, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे असलेला डान्सबार, राज्य सरकारमधील मंत्र्यांचे आणि अधिकाऱयांचे हनीट्रप प्रकरण अशा अनेक विषयांचा जाहीर पंचनामा या आंदोलनात शिवसेनेकडून केला जाणार आहे. राज्य स्तरावर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर तर मुंबईतील सर्व विभागांत सोमवारी दुपारी 12 वाजता हे उग्र आंदोलन होईल, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
जवळच्या लोकांना श्रीमंत करणे हाच मंत्र्यांचा उद्योग
रमी खेळणाऱया कृषी मंत्र्याला क्रीडामंत्री पदाची लॉटरी लागते. ‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काय जाते’ असे विधान करणाऱया समाजकल्याण मंत्र्याला साधी माफी मागायला सांगितले जात नाही. ‘हे सरकार भिकारी आहे’, असे म्हणणारे मंत्री मंत्रिमंडळात कायम राहतात, भ्रष्टाचार करणे आणि भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशातून आपल्या जवळच्या लोकांना श्रीमंत करणे एवढाच या सरकारमधील मंत्र्यांचा उद्योग असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. कलंकित मंत्र्यांचे सर्व उद्योग आंदोलनातून जगजाहीर केले जाणार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.