वर्षभरात विकासाची कामे व आवश्यक प्रश्न न सोडल्यास राजीनामा देईल, बॉण्ड पेपरवर लिहून घरोघरी प्रचार; शिवसेनेच्या निता जैन यांचा अनोखा प्रचार

>> विजय जोशी

गौतम जैन हा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कट्टर कार्यकर्ता. त्यांची पत्नी निता गौतम जैन या प्रभाग क्र.१६ ब-मधून शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या निवडणुकीत त्यांनी घरोघरी बॉण्डवर लिहून देवून तुमच्या भागातील मुलभूत समस्या सोडविण्यात अपयशी ठरले तर आपण राजीनामा देऊ, असे बॉण्डवर लिहून प्रचार करत असून या आगळ्यावेगळ्या प्रचाराची सर्वत्र चर्चा होत आहे.

गौतम जैन आणि निता गौतम जैन यांनी प्रभाग क्र.६ आणि प्रभाग क्र.१६ मधून उमेदवारी दाखल केली. मात्र एकाच कुटुंबात दोघांना उमेदवारी नको म्हणून गौतम जैन यांनी प्रभाग क्र.६ ब-मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तो अर्ज परत घेतला. त्याचीही चर्चा सर्वत्र सुरु झाली. एकीकडे काँग्रेसने दोन कुटुंबात पती-पत्नींना उमेदवारी दिली. त्यावर सर्वत्र टीका होत असताना गौतम जैन यांनी आपला अर्ज मागे घेवून प्रभाग क्र.१६ ब-मधून आपली पत्नी निता गौतम जैन यांची उमेदवारी कायम ठेवली. प्रत्येक घरात जावून त्यांनी एक बॉण्ड व त्याची कॉपी मतदारांना दिली आहे. तुमच्या भागातील प्रश्न सोडविण्याची जबाबदारी माझी आहे, प्रभागातील मुलभूत प्रश्न जसे पाणी, कचरा, ड्रेनेज, दिवाबत्ती, रस्ते याबद्दल वर्षभरात आपण काम करु, आपले समाधान न झाल्यास एक वर्षानंतर आपण आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देवू असे या बॉण्डमध्ये उल्लेखीत केले आहे. प्रभाग क्र.१६ मधील प्रत्येक घरात हे जोडपे जावून आपल्या वचननाम्याची बॉण्डव्दारे कॉपी देत आहेत. घरातील प्रत्येकांना तुमच्या भागातील समस्या काय आहेत, त्या कशा पद्धतीने सोडवाव्यात, नेमके प्रश्न कोणत्या विभागाचे आहेत, याबद्दलची माहिती घेवून प्रत्येक कुटुंबांची आस्थेवाईकपणे हे जोडपे चौकशी करत आहेत. आपण समाधानकारक काम न केल्यास किंवा तुमचे प्रश्न न सोडविल्यास त्याच दिवशी वर्षभरानंतर आपण राजीनामा देऊ, पहिले एक वर्ष माझे काम बघा, तुमच्या दररोज संपर्कात राहील आणि कामाबद्दल समाधानी आहात किंवा नाही याबद्दल चर्चा करणार, मतदारांच्या संपर्कात राहणार, एकवेळा आम्हाला संधी देवून बघा, हा बॉण्ड पेपर आम्ही तुमच्याकडे देत आहोत, वर्षभरात तुमचे समाधान नाही झाले तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन, असे निता जैन व गौतम जैन हे जोडपे प्रत्येकाला सांगत आहेत.

गेल्या दहा वर्षापासून गौतम जैन हे सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रामध्ये जनतेच्या संपर्कात आहेत. गोरक्षण संदर्भात अवैधरित्या गोवंशाची होणारी कत्तल, वैद्यकीय सेवेत होणारी लुटमार, कोरोनाच्या काळात रुग्णांना केलेली मदत, सामाजिक क्षेत्रात विविध पध्दतीने स्वतः मदतीला धावून प्रत्येकाला केलेली मदत, रक्तदान व रक्ताची जेथे गरज आहे त्याठिकाणी स्वतः किंवा इतर रक्तदात्यांना पाठपुरावा करुन अनेक रुग्णांची प्राण त्यांनी वाचविले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या पक्षात एकनिष्ठ राहिलेल्या गौतम जैन यांनी आपल्या पत्नीसोबत प्रचार करताना एक नवा अनोखा उपक्रम राबविल्याने त्याची सबंध शहरात चर्चा होत आहे.