दहशतवादाविरुद्ध आम्ही एकजूट; उद्धव ठाकरे यांना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा फोन, सर्वपक्षीय शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदींचा समावेश

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सोमवारी फोनवरून संपर्क केला. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी विदेशात निघालेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाबाबत उद्धव ठाकरे आणि किरेन रिजिजू यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत रिजिजू यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळामागची सरकारची भूमिका स्पष्ट केली. या चर्चेनंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळात शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश करण्यात आला आहे.

विदेशात जाणारे सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे राजकीय विरोधात नाही तर दहशतवादाविरुद्ध आहे, याची खात्री आम्हाला मिळाली. आणि या शिष्टमंडळाच्या माध्यमातून देशासाठी जे योग्य आणि आवश्यक आहे ते आम्ही करू, असे आश्वासन आम्ही सरकारला दिले आहे. यानुसार या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश असेल.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत विशेषतः पाकिस्तानमधील दहशतवादी आणि त्यांची तळं नष्ट करण्यासाठी पंतप्रधानांना पाठिंबा दर्शविला. दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या सैन्य दलांसोबत आपण सर्वजण एकत्र आहोत याबद्दल कोणतेही दुमत नसावे.

देशाशी गद्दारी मान्य नाही, आम्ही प्रश्न विचारणारच; काँग्रेसने मोदी सरकारला सुनावले

पहलगामवरील हल्ल्यात गुप्तचर/ सुरक्षा यंत्रणेचे अपयश आणि त्यानंतरची राजनैतिक परिस्थिती यावर आपली मते वेगवेगळे आहेत. आणि म्हणून आम्ही आमच्या देशाच्या हितासाठी प्रश्न उपस्थित करतच राहू. दरम्यान, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी, त्याला एकाकी पाडण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र आले पाहिजे.

पहलगाम हल्ल्याच्या आधीच गुप्त माहिती मिळाल्यानंतर PM मोदींनी काश्मीर दौरा रद्द केला होता – मल्लिकार्जुन खर्गे

आम्ही केंद्र सरकारला असेही कळवले आहे की, आम्ही या मुद्द्यावर एकजूट आहोत. पण कुठलाही गोंधळ आणि गैरव्यवस्था टाळण्यासाठी या शिष्टमंडळाबद्दल पक्षांना माहिती देण्यासाठी प्रोटोकॉल पाळला जावा. काल एका फोन कॉलद्वारे ते घडले. यामुळे राष्ट्रीय हिताच्या अशा कोणत्याही कृतीला आम्ही पुन्हा पाठिंबा जाहीर केला आहे.

पहलगाम दहशतवाही हल्ला ते ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा करण्यासाठी आणि यावर आवाज उठवण्यासाठी आम्ही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली लवकरात लवकर सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी आमची मागणीही केली आहे. दहशतवाद विरुद्धच्या लढाईत आपण एकजूट आहोत. जय हिंद!, असे शिवसेनेने म्हटले आहे.