शिवसेनेचा दणका, पीव्हीआर चित्रपटगृहातील हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांचे सर्व लाईव्ह शो रद्द

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दणक्यानंतर पीव्हीआर सिनेमाने हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे सर्व शो रद्द केले आहेत. शिवसेनेने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

आशिया कपचा अंतिम सामना रविवारी हिंदुस्थान-पाकिस्तान संघात खेळला जाणार होता. या लढतीचे थेट प्रक्षेपण पीव्हीआर सिनेमामध्ये मोठ्या पडद्यावर करण्यात येणार होते. पहलगाम आतंकवादी हल्ल्यात ज्या पाकिस्तानचा संबंध आहे त्याच पाकिस्तानसोबत होणारे क्रिकेट सामने हे भारतीय जनतेच्या भावनांशी केलेला खेळ आहे, असे म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा सामना पीव्हीआरमध्ये दाखवण्यास कडाडून विरोध केला होता.

हे सगळं अत्यंत घृणास्पद आहे, आदित्य ठाकरे यांनी PVR Cinemas ला फटकारले

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही हा मुद्दा रेटून धरला होता. तसेच शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी पीव्हीआर व्यावस्थापनाशी याबाबत याबाबत चर्चा केली होती. शिवसेनेच्या या दणक्यानंतर पीव्हीआर चित्रपटगृहातील हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांचे सर्व शो रद्द करण्यात आले आहेत.

शिवसेनेचा ठाकरी दणका, अखिल चित्रे यांचे ट्विट

आदित्य ठाकरे यांच्या आदेशानंतर काल आम्ही तातडीने ‘पीव्हीआर’च्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला आणि त्यांना भूमिका समजावून सांगितली. एकूणच महाराष्ट्रातील लोकभावना आणि शिवसेनेचा ठाकरी दणका पाहता त्यांनी महाराष्ट्रातील ‘भारत–पाकिस्तान क्रिकेट सामन्या’चं सर्व लाईव्ह शो रद्द केले. एक निश्चित, क्रिकेटच्या आडून कुणीही आम्हा भारतीयांच्या देशभक्तीचा व्यापार करत असेल तर आम्ही आमच्या महाराष्ट्रात ते होऊ देणार नाही.. आणि हो, सत्तेपुढे लाचार, सत्तेसाठी गद्दार आणि सत्ताधाऱ्यांसाठी पक्षावर डल्ला मारणाऱ्यांना आमचं दैवत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या अशा रोखठोक भूमिका पुढे कधी नेताच येणार नाहीत, कारण त्यांचा मोटाभाई दिल्लीत असतो, असे ट्विट अखिल चित्रे यांनी केले.

संजय राऊत यांचे ट्विट

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केले होते. तसेच एक्स अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट शेअर करत हा नीचपणाचा कळस असल्याचे म्हटले होते. PVR मधील “पी” म्हणजे पाकिस्तान आहे काय? हे पीव्हीआर वाले भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण सर्वत्र दाखवणार आहेत. यांच्यात एवढी हिम्मत आणि निर्लज्जपणा येतो कुठून? सोनम वांगचुक यांना पाकिस्तानशी सहानुभूती ठेवल्याच्या आरोपाखाली देशद्रोही ठरवून अटक केली, आता त्याच आरोपाखाली या हरामखोर पीव्हीआर वाल्यांना अटक करा. फडणवीस आहे एवढी हिम्मत? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. तसेच भारत-पाकिस्तान सामना खेळणे, खेळवणे, दाखवणे, पाहणे हा पहलगाम मधील सिंदूर उजाडलेल्या महिलांचा अपमान आहे, देश द्रोह आहे! क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही! पीव्हीआर तुमच्याकडे हिंदुतवादी जनतेचे लक्ष्य आहे! असेही राऊत यांनी ठणकावले होते.