
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने पळवण्याचा प्रयत्न झाला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात एका गटाने सत्तेत सहभागी होत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यामुळे राज्यात अभुतपूर्व राजकीय गोंधळ उडाला असून यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परखड शब्दात भाष्य केले आहे. पूर्वी पक्ष फोडला जायचा, पण आता पक्षच पळवला जातोय, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. विदर्भ दौऱ्यावर असताना पोहरादेवीच्या दर्शनाआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
राज्यातील रायकीय गोंधळाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकारणात फोडाफोडी नवीन नाही. मात्र पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पळवला जातोय. पक्ष पळवल्यानंतरही आम्हाला जनतेकडून प्रतिसाद मिळतोय, याचे प्रत्यंतर माझ्या सभा झाल्या त्यात दिसले. आताही येताना लोकं जागोजागी थांबलेली होती. कुठेही गेलो तर लोकं समोरून येऊन सांगताहेत की, जे काही घडतंय ते वाईट आहे. ही परंपरा, हा पायंडा महाराष्ट्रासाठी वाईट आहे. तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत.
अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला होता
2019मध्ये ठरलेल्या अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. त्यावेळी अमित शहा आणि माझे ठरले होते. त्यांनी कितीही नाही म्हणोत, मी माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन शिवाजी पार्कवर हे बोललो आहे. आता पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो अडीच वर्ष शिवसेनेचा आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री ठरला होता. त्याप्रमाणे केले असते तर आतापर्यंत भाजप किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन गेला असता. आज जे भाजपचे जुने कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आहेत त्यांना इतर पक्षातून आलेल्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागत आहे ते घडले नसते.
..तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे
आमदारांच्या अपात्रतेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने जो काही अर्थ काढून दिलेला आहे त्याच्या पलीकडे कोणालाही पाहता येणार नाही. न्यायालयाने स्पष्ट शब्दांमध्ये निकाल दिलेला आहे आणि त्या निकालाच्या चौकटीत राहूनच अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतलाच तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, तिथे दाद मागू, असेही ते म्हणाले.
View this post on Instagram
आता हे काय लावून बसलेत…
भाजप आता काही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. त्यांनी दुसऱ्यावर दोषारोप करण्याचे सोडून द्यावे. आधी त्यांनी त्यांच्या घरात घुसवून घेतलेल्या बाजारबुणग्यांचा सांभाळ करावा. अजित पवारांमुळे शिवसेना सोडली म्हणणारे, बाळासाहेबांना अटक करायला निघालेल्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणालेले आता काय लावून बसले आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांना लगावला.
View this post on Instagram
पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे –
– पोहरादेवीला येण्याचे माझ्या मनात होते. तिर्थक्षेत्राच्या ठिकाणाहून दौऱ्याची सुरुवात करतोय.
– माझा सभेचा आग्रह नाही. सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी आलोय.
– इथे प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हायचंय, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्याला काय मिळतंय? त्याच्या मालाला हमीभाव किंवा हमखास भाव मिळतोय का?
– मैत्री म्हणूनच 2019 ला युती केली आणि लढलो. पण युतीत जे ठरले होते ते त्यांनी नाकारले आणि मला युतीच्या बाहेर ढकलले. ज्या पद्धतीने शिवसेना फोडली हे मैत्रीचे लक्षण असेल असे वाटते का?
“सावधान गद्दारांनो तुमचा बाप दिग्रसला येतोय”, यवतमाळ जिल्ह्यात लागले पोस्टर्स






























































