
राजकीय आणि व्यावसायिक जाहिरातींच्या स्पर्धेत शहरात बेकायदा महाकाय होर्डिंग उभे करण्यात आल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे हे अनधिकृत होर्डिंग तातडीने हटवण्यात यावेत या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महापालिका मुख्यालयावर धडक देण्यात आली. शहरातील बेकायदा होर्डिंगवर जर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शहरात अनेक ठिकाणी बेकायदा महाकाय होर्डिंग उभे राहिले आहेत. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राजकीय आणि व्यावसायिक जाहिरातींच्या स्पर्धेत शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली जाते. त्यासाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. या बॅनरबाजीमुळे शहर विद्रुप होऊन महापालिकेचा महसूलही बुडत आहे. होर्डिंग आणि बॅनरबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा युवाधिकारी पराग मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयावर धडक देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र वाहतूक सेना राज्य चिटणीस विलास कामोठकर, शहरप्रमुख प्रवीण जाधव, महेश गुरव, विधानसभा समन्वयक अरविंद कडव, मनोज कुंभारकर, तालुका चिटणीस अजय पाटील, महानगर समन्वयक जय कुष्ठे, उपशहरप्रमुख रोहित टेमघरे, विभागप्रमुख अमित माळी, कळंबोली उपविभागप्रमुख तुषार निढाळकर, शहर चिटणीस सृजन जोशी आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त पालिका आयुक्त गणेश शेटे यांना मागण्यांचे निवेदन दिले.