उत्तर प्रदेशात शिवसेना 50 पेक्षा जास्त जागांवर लढणार! खासदार संजय राऊत यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाटांचे तडाखे बसायला सुरुवात झाली आहे. सध्या मंद लाटा आहेत, पण त्या कधीही उसळू शकतात. त्यामुळे भाजप ओपिनियन पोलच्या माध्यमातून ज्या अफवा पसरवतेय त्यावर विश्वास ठेवू नका. गोवा आणि उत्तर प्रदेशात परिवर्तन निश्चित आहे. असे ठामपणे सांगतानाच उत्तर प्रदेशात शिवसेना 50 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवू शकते, असे सूतोवाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

उत्तर प्रदेशातील घडामोडींवर खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गोव्यात भाजपचे मंत्री आणि आमदाराने भाजप सोडला म्हणजे गोव्यात भाजप अभेद्य नाही. उत्तर प्रदेशातदेखील अनेक आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. याचाच अर्थ हवामानाचा अंदाज काही लोकांना आला आहे. मौर्य यांना हवेचा अंदाज पटकन येतो. त्यामुळे भाजपने सावध राहावे, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

…तर गोव्यात स्वबळावर लढू

गोव्यात आमचे आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. जर काही मनाप्रमाणे नाही घडले तर आम्ही स्वबळावर लढू. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे. आताच वेणुगोपाल यांच्याशीही चर्चा झाली. एकत्र लढलो तर गोव्यात परिवर्तन घडवू शकतो. शिवसेनेसारखा हिंदू विचारांचा पक्ष आघाडीत असणे चांगले आहे, मात्र गोव्यात तृणमूलसोबत जाणार नाही. भिन्न विचारांच्या पक्षांसोबत एकाच वेळी चर्चा नाही. गोव्यात महाविकास आघाडी असावी, पण जर काँग्रेसची इच्छा नसेल तर स्वबळावर निवडणूक लढवू, असे संजय राऊत म्हणाले.