
मुंबई, नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी-न्हावा-शेवा अटल सेतूवर वेगमर्यादा जाहीर करण्यात आली आहे. कार /टॅक्सी, हलकी वाहने, मिनी बस, ट्रक, अवजड वाहनांना प्रति तास 100 ची वेगमर्यादा असणार आहे, तर या पुलावर मोटरसायकल, स्कूटर, मोपेड, तीनचाकी टेम्पो, ट्रक्टरला बंदी असणार आहे.
सुमारे 1800 कोटी रुपये खर्च करून शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू बांधण्यात आला आहे. सुमारे 22 किलोमीटर लांबीचा हा पूल असून 16.80 किमी मार्गाचा रस्ता हा समुद्रातून आहे. या प्रकल्पामुळे मुंबई, नवी मुंबई, रायगडमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर असणार आहे. या पुलावर 6 मार्गिका आहेत. शिवडी, शिवाजी नगर आणि जासई आणि चिर्ले येथे इंटरचेज आहेत. या पुलावर अपघाताचे प्रकार होऊ नयेत म्हणून वाहतूक पोलिसांनी वेगमर्यादा जाहीर केली आहे. कार/टॅक्सी, मिनी बस, ट्रक, अवजड वाहनांना प्रति तास 100ची वेगमर्यादा असणार आहे. उड्डाणपूल चढताना आणि उतरताना 40 किमी प्रति तास असेल. तर ट्रक, अवजड वाहने यांनादेखील चढण, उतरणीच्या वेळी 40 किमी प्रति तास अशी वेगमर्यादा असणार आहे. ट्रक, अवजड वाहनांना पूर्व मुक्ती महामार्गावर बंदी आहे. त्यामुळे त्या वाहनांनी मुंबई पोर्ट बाह्य रस्त्यावरून खाली येऊन गाडी अड्डा, एमबीपीटी रोड येथून वाहतूक करावी लागणार आहे. या पुलावर अपघाताचे प्रकार होऊ नयेत म्हणून मोटरसायकल, स्कूटर, मोपेड, तीनचाकी टेम्पो, ट्रक्टरला बंदी असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
प्रति तास वेगमर्यादा 100 – कार/टॅक्सी, हलकी वाहने, मिनी बस, ट्रक, अवजड वाहने.
बंदी – मोटरसायकल, स्कूटर, मोपेड, तीनचाकी टेम्पो, ट्रक्टर.




























































