
शिवडीतील प्रभाग क्रमांक 206 मधील खिमजी विश्राम बिल्डिंग येथील 23 वर्षे बंद असलेली महापालिका शाळा शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे पुन्हा सुरू झाली आहे. शिवडीतील विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय लक्षात घेऊन शिवसेनेने यशस्वी पाठपुरावा केला होता. ही शाळा पुन्हा सुरू झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिवडी हा कामगार आणि कष्टकरी वर्गाचा परिसर असून इथे दर्जेदार शैक्षणिक सुविधा देणाऱया संस्था कमी आहेत. त्यात शिवडीतील प्रभाग क्रमांक 206 मधील खिमजी विश्राम बिल्डिंग येथील महापालिका शाळा गेली 23 वर्षे बंद होती. त्याबाबत शिवसेना खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे यांच्या सहकार्याने नगरसेवक सचिन पडवळ यांनी पाठपुरावा करून साऊथ शिवडी मुंबई पब्लिक स्कूल ही महापालिकेची शाळा पुन्हा सुरू केली आहे.
शाळेत मोफत प्रवेश दिला जाणार असून मोफत शैक्षणिक साहित्य, तज्ञ शिक्षक वर्ग, मोफत मध्यान्ह भोजन, सुसज्ज वाचनालय मोफत संगणक वर्ग, कृतीयुक्त शिक्षण दिले जाणार आहे. 2021-22 वर्षासाठी 30 सप्टेंबर 2021 ला चार वर्षे पूर्ण झालेल्या मुलांसाठी ज्युनियर केजी तर पाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांसाठी सीनियर केजीचे प्रवेश सुरू होणार आहेत. त्याचबरोबर ऑनलाइन प्रवेश सुरू आहेत. पहिल्या 30 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
विद्यार्थी-पालकांची गैरसोय दूर
मुंबई महापालिका मुंबईकरांना आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, रस्ते यासारख्या दर्जेदार सुविधा देत आहे. ही शाळा गेली अनेक वर्षे बंद असल्यामुळे परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर झाल्याने आता पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.




























































