
राज्यातील पुरातत्व मंदिरे, गडकिल्ले आणि स्मारक यांचे जतन आणि संवर्धन करणे हे राज्य सरकारचे काम आहे, परंतु राज्यातील मिंधे सरकार आणि त्यांचे मंत्री केवळ जाहिरातबाजी करण्यात दंग आहेत. त्यांना किल्ले आणि स्मारकांकडे लक्ष द्यायला आजिबात वेळ मिळत नाहीय. राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या मुंबईतील शिवडी किल्ल्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते आणि स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, परंतु केवळ मंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून या किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन रखडले आहे.
शिवडी येथील ऐतिहासिक व पुरातन वास्तू असलेल्या शिवडी किल्ल्याची डागडुजी, दुरुस्ती करून किल्ल्याभोवतीची तटबंदी अधिक मजबूत करण्याची नितांत गरज आहे. यासाठी अजय चौधरी हे गेल्या चार ते पाच वर्षांपासून संबंधित खात्यांशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करीत आहेत, मंत्र्यांना पत्रव्यवहार करत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना बजेटमध्ये तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी शिवडी किल्ल्याच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी 2022 मधील बजेटमध्ये जवळपास नऊ कोटी रुपये मंजूर केले होते, परंतु मिंधे सरकारने या कामाला स्थगिती दिली. या स्थगितीनंतर अजय चौधरी यांनी पुन्हा संबंधितांशी पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा करत निधी मंजूर करून घेतला, जिल्हाधिकाऱयांसोबत बैठक घेतली. महापालिका किंवा पुरातत्व विभाग हे काम करतील असेही या बैठकीत ठरले. बजेट मंजूर झाले, वर्क ऑर्डर निघाली, परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचे भूमिपूजन रखडले आहे. गेल्या शनिवारी स्थानिक आमदाराच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करायचे ठरले होते, परंतु मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन करायचे म्हणून ते पुन्हा रखडले आहे. कामाचे नियोजन झाले आहे, निधी वर्ग झाला आहे. तरीही या कामासाठी मंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने शिवडी किल्ल्याला गतवैभव कधीपर्यंत मिळणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
फ्लेमिंगो पक्षी पाहण्याचे ठिकाण
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला व हार्बर रेल्वे मार्गावर शिवडी स्थानकाच्या पश्चिमेला एक सुंदर किल्ला म्हणजे शिवडीचा किल्ला. किल्ल्याची समुद्राकडील बाजू म्हणजे शिवडीची दलदल हे फ्लेमिंगो पक्ष्यांचे आवडते ठिकाण. दरवर्षी डिसेंबर ते एप्रिलदरम्यान लाखोंच्या संख्येने येथे फ्लेमिंगो पक्षी येतात. शिवडी किल्ल्याच्या पूर्वेकडील खाडीत किनाऱयावरील भाग दलदलीचा आहे. तो ‘ओटोलिया’ वनस्पतीच्या पोषणास उत्तम असल्याने ही वनस्पती या दलदलीच्या भागात वाढलेली आहे. ही वनस्पती व त्यावर उपजीविका करणारे लहान प्राणी, कीटक हे येथे येणाऱया फ्लेमिंगो पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे उन्हाळा संपेपर्यंत सात महिने येथे फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवेच्या थवे पाहावयास मिळतात.
लवकरात लवकर भूमिपूजन करा
समुद्रकिनारी असलेला शिवडी किल्ला हा पर्यटनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. फ्लेमिंगो पाहण्यासाठी देशविदेशातील पर्यटक या ठिकाणी येतात. तसेच या ठिकाणी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूही पाहण्यासारखा आहे. या सरकारमध्ये कुठल्याच मंत्र्यांना वेळ नाही. जर मंत्र्यांना वेळ मिळत नसेल तर स्थानिक आमदार किंवा प्रशासनाने या कामाचे भूमिपूजन करावे, परंतु भूमिपूजन लवकरात लवकर करणे गरजेचे आहे.
अजय चौधरी, शिवसेना विधानसभा गटनेते
एकेकाळी ‘मुंबईची राखण करणारा किल्ला’ अशी शिवडीच्या किल्ल्याची ओळख होती. मुंबई बेटावर वांद्रे, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा, शीव, शिवडी, माझगाव, डोंगरी, सेंट जॉर्ज फोर्ट, मुंबई फोर्ट असे एकूण 11 किल्ले बांधण्यात आले होते. यापैकी मुंबई फोर्ट, माझगाव आणि डोंगरी हे किल्ले अस्तित्वात नाहीत, परंतु मुंबईची साक्ष देणारे वरळी, शीव, धारावी, माहीम आणि वांद्रय़ाचा किल्ला आजही अस्तित्वासाठी धडपडत आहेत.

























































